प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
प्रदीप पुरणेकर प्रकरणी राम पुरणेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पुरणेकर यांनी मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी पुरणेकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. राम पुरणेकर पोलिसांना योग्य पुरावे सादर करणार असून, मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीकडे लक्ष लागले आहे.
ठाण्यातील प्रदीप पुरणेकर प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. प्रदीप पुरणेकर यांचे पुत्र राम पुरणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्याची मागणी केली आहे. यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडूनच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी राम पुरणेकर यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीदरम्यान, राम पुरणेकर यांनी पोलीस तपासातील निष्पन्न झालेल्या बाबी आणि पुरवणी जबाबमध्ये नमूद केलेली माहिती मुख्यमंत्र्यांना सादर केली. यामध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एसआयटी पथकाने यापूर्वीच पाच आरोपींना अटक केली असून, राजेंद्र शिंदे यांची सात वेळा तर मीनाक्षी शिंदे यांची एकदा चौकशी झाली आहे. राम पुरणेकर यांनी राजेंद्र शिंदे हेच या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आता या प्रकरणात पुढील काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
