काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय… प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड, रुग्णालयावर गंभीर आरोप; ‘सैराट’शी कनेक्शन काय?
'सैराट' चित्रपटातील परश्याचा मित्र ‘सल्या’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता अरबाज शेख सध्या एका भावनिक व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. आपल्या वडिलांच्या उपचारादरम्यान रुग्णालयाकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, या आरोपांवर संबंधित रुग्णालयानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘सैराट’ चित्रपटातील परश्याचा मित्र ‘सल्या’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता अरबाज शेख सध्या एका भावनिक व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. आपल्या वडिलांच्या उपचारादरम्यान रुग्णालयाकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, या आरोपांवर संबंधित रुग्णालयानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज शेख यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाकडून औषधे केवळ त्यांच्या मेडिकलमधूनच खरेदी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप अरबाजने केला आहे. बाहेरून हीच औषधे कमी किमतीत मिळाली असती, मात्र रुग्णालयात त्यासाठी सुमारे ४० हजार रुपयांचे बिल आकारण्यात आल्याचा दावा त्याने केला.
यामुळे वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, “माझ्या वडिलांना मला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचे आहे. कृपया योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करा,” अशी भावनिक विनंती त्याने व्हिडिओद्वारे केली आहे.
दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजद सय्यद यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “रुग्णांनी औषधे आमच्याच मेडिकलमधून घ्यावीत, अशी कोणतीही सक्ती केली जात नाही. रुग्णाच्या उपचाराचा आणि खर्चाचा संपूर्ण अंदाज आधीच कुटुंबीयांना देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर असे आरोप का करण्यात आले, याची माहिती नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, अभिनेता अरबाज शेख यांच्या आरोपांनंतर आणि रुग्णालयाच्या स्पष्टीकरणानंतर या वादाला नवे वळण मिळाले आहे.
