Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
संजय राऊत यांनी पूर्णेकर हत्या प्रकरणामागे १००% स्थानिक राजकीय गट असल्याचा आरोप केला आहे. मृत प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाने हल्लेखोरांना पाहिले असून, त्यांचा राजेंद्र शिंदे यांच्याशी संबंध असल्याचा दावा केला आहे. पूर्णेकरांनी ड्रग्ज पुरवठादार आणि क्लस्टर विरोधात लढा दिला होता. राऊतांनी ठाण्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेवरही चिंता व्यक्त केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. पूर्णेकर यांच्या हत्येमागे १०० टक्के स्थानिक राजकीय गट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह घटनेनंतर पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.
राऊत यांनी मृत पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांच्या हवाल्याने सांगितले की, हल्लेखोरांना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ दोन दिवसांपूर्वी पाहिले होते. तसेच, आरोपी आणि मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यात जवळीक होती, ज्याचे पुरावे म्हणून छायाचित्रे पोलीस ठाण्यात सादर करण्यात आली होती. हे आरोप राऊत यांचे नसून, प्रत्यक्षदर्शी राम पूर्णेकर यांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदीप पूर्णेकर यांनी यापूर्वी ड्रग्ज पुरवठादार आणि ठाणे क्लस्टर प्रकल्पांविरोधात आघाडी उघडली होती, असेही राऊत यांनी नमूद केले. त्यांनी मीनाक्षी शिंदे यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला, कारण या प्रकरणात त्यांचे आणि त्यांच्या पतीचे नाव समोर येत आहे. ठाण्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून, बीडपेक्षाही वाईट स्थिती झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. भाजपच्या उपमहापौरांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
