थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत हे काय बोलून गेले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडल्याने विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे मोठे आणि आदरणीय नेते असल्याचे सांगतानाच त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, असे राऊत म्हणाले. ज्या नेत्यांमुळे महाविकास आघाडी सरकार पडले, त्यांच्याच छताखाली बैठक घेणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. समोर राष्ट्रवादी भवन आणि वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठानसारखी ठिकाणे उपलब्ध असताना हा निर्णय का घेण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काही राजकीय मर्यादा आणि भूमिका जपल्या पाहिजेत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या भेटीचे पडसाद आगामी काळात राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच या भेटीने शिवसेनेचं मन दुखावल्याचं राऊतांनी बोलून दाखवलं.