Sanjay Raut News : जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केलं; राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On Jaykumar Gore : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांच्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या पक्षाची आणि सरकारची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी उचलेलं पाऊल आहे. पण बीडमध्ये असा खून झालेला असताना आणि त्या खुनाचे शिंतोडे धनंजय मुंडे यांच्यावर असताना त्यांना मंत्रिमंडळात घेणं आणि त्यांचं नाव राज्यपालांना पाठवणं इथूनच अपराधाला सुरुवात होते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.
यावेळी बोलताना राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील टिकास्त्र डागलं. मुख्यमंत्री फडणवीस यांचे जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. ते एक विकृत मंत्री असल्याचं देखील राऊत यांनी म्हंटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा, मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे, त्याची माहिती समोर आली असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचाही दावा राऊतांकडून करण्यात आलेला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मात्र आता खळबळ उडाली आहे.