MP Sanjay Raut News : ही क्रूरता औरंगजेबाचीच; संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडेबोल
Sanjay Raut On Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ही क्रूरता औरंगजेबाची असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
जी क्रूरता औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत केली होती. आज तीच क्रूरता संतोष देशमुख यांच्या हत्येत दिसली आहे. त्यांच्या मृत्यूचा खेळ राजकारण्यांनी केला, असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे, हे दिसत आहे. समोर आलेल्या गोष्टींमधून किती पराकोटीचे क्रौर्य या महाराष्ट्रात, बीडमध्ये घडलं हेच दिसतं आहे आणि हे सर्व आरोपी मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या, दहशत, दाखवून कसे मतदान करू दिले नाही हे सत्ताधाऱ्यांनी पाहिले होते. त्यांची निवडणूक त्याचवेळी रद्द झाली असती तर आज संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, असे खडेबोल यावेळी राऊत यांनी सुनावले. मुख्यमंत्री काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत. फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर राज्यात इतर कोणीही कायद्याचा गैरवापर करू नये, याची त्यांनी काळजी घ्यायला हवी, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.