Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

| Updated on: Oct 27, 2026 | 10:44 AM

संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारवर मानवी राक्षस असल्याची टीका केली आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये २,५०० हून अधिक झाडे तोडण्यात आली असून ३३,००० झाडे तोडण्याचा सरकारचा मानस आहे. आदिवासींची जमीन, जंगल नष्ट करून टोरंट कंपनीला परवानगी दिल्याचा आरोप राऊतांनी केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारवर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या कथित वृक्षतोडीवरून गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सरकारला मानवी राक्षस असे संबोधत, महाराष्ट्रातील जंगल नष्ट केले जात असल्याचा दावा केला.

राऊत यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन हजाराहून अधिक झाडे तोडली गेली असून, त्यांनी शेवटचा आकडा २५०३ पाहिला आहे. पहिल्या टप्प्यात ३३ हजार झाडे तोडण्याचा सरकारचा मानस असल्याचे राऊत यांनी म्हटले. यामुळे संपूर्ण जंगल नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हे जंगल भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून केवळ २० किलोमीटर अंतरावर आहे.

या वृक्षतोडीला देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातच्या टोरंट कंपनीला परवानगी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला. मेहता, शाह नावाच्या व्यक्तींना अख्खे जंगल ताब्यात दिल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिकांनी विरोध केल्यास शेतकऱ्यांवर बंदुका रोखल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. रायगड जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पोलीस उपस्थित असून ग्रामस्थांना मारण्यासाठी आले आहेत, असे राऊत म्हणाले. याविरोधात आपली लढाई थांबणार नाही असे सांगत त्यांनी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह देशभरातील पर्यावरणवाद्यांनी संपर्क साधल्याची माहिती दिली.

 

Published on: Oct 27, 2026 10:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us