सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट

सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट

| Updated on: Nov 07, 2026 | 6:23 PM

सोनिया गांधींनी भाजपवर टीका करत म्हटले की, गेल्या १२ वर्षांत देशाची सामाजिक वीण उसवली असून घटनात्मक संस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर भाजप नेते बावनकुळेंनी काँग्रेसला आपला आणीबाणीचा इतिहास तपासण्याचा सल्ला दिला. निवडणूक आयोग, माध्यमे आणि लोकशाही संस्थांवर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव असल्याचा आरोपही गांधींनी केला.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या १२ वर्षांच्या काळात देशाची सामाजिक वीण उसवली असून घटनात्मक संस्थांचे मोठे नुकसान झाल्याची तीव्र शब्दांत टीका केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये गांधींनी भाजप सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या आरोपानुसार, विरोधी पक्षांना समान संधी मिळत नाहीये, तर निवडणूक आयोग आणि इतर महत्त्वाच्या संस्थांवर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण आहे. सोनिया गांधींनी म्हटले की, मुख्य प्रवाहातील माध्यमांवरही सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसून येतो आहे. पैशांची ताकद आणि धर्माचा राजकीय वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावाही त्यांनी केला.

मोदी सरकार सत्तेतून गेल्यानंतरही देशातील व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी बराच वेळ आणि प्रयत्न लागतील, असेही गांधी म्हणाल्या. लोकांमध्ये अस्वस्थता वाढत असून त्यांना या नुकसानीची जाणीव होऊ लागली आहे, मात्र देशात पुन्हा सुशासन येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोनिया गांधींच्या या टीकेला भाजप नेते बावनकुळेंनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. त्यांनी गांधींना काँग्रेसचा ६५ वर्षांचा इतिहास तपासण्याचा सल्ला दिला. ज्या पक्षाने देशावर आणीबाणी लादली, मूलभूत अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य आणि बोलण्याचे अधिकार काढून घेतले, त्या पक्षाला असे बोलण्याचा अधिकार नाही, असे बावनकुळे म्हणाले. स्वर्गीय इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीच आणीबाणी लादल्याची आठवण त्यांनी करून दिली.

Published on: Nov 07, 2026 6:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us