मराठीचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढवणे काळाची गरज; सुनेत्रा पवारांचे वक्तव्य

| Updated on: Feb 27, 2026 | 12:46 PM

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुनेत्रा पवार यांनी मराठी भाषेच्या संवर्धनावर भर दिला. सरकार वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देत असून, लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यास ५ कोटींचा निधी दिला आहे. प्रशासनात व दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवणे आणि डिजिटल माध्यमांवर भाषेला सक्षम करणे आवश्यक आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठी भाषेच्या संवर्धनावर आपले विचार मांडले. कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी साजरा होणारा हा दिन मराठी भाषेच्या सामर्थ्याचा आणि तेजाचा उत्सव आहे, असे त्यांनी नमूद केले. मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून, ती आपली संस्कृती, ओळख आणि अभिमान आहे. राज्यशासन मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी कटिबद्ध आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि परदेशातही मराठी भाषा पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे लंडनमधील मराठी लोकांसाठी महाराष्ट्र भवन उभारणीसाठी दोन महिन्यांपूर्वी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभरात पोहोचेल, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. प्रशासनात आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवणे ही काळाची गरज असून, तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेला डिजिटल माध्यमावर सक्षमपणे नेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे आवाहन त्यांनी केले.

Published on: Feb 27, 2026 12:46 PM
Follow Us