Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर…, विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेचे कर्ज भरू नये, असे आवाहन विवेकानंद पाटील यांनी केले आहे. बँक अधिकारी आल्यास आपले नाव सांगावे, असे पाटील यांनी म्हटले. त्यांनी सरकारमधील नेत्यांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी, असेही आवाहन केले.
राज्यात सध्या कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेचे नेते विवेकानंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जफेडीबाबत मोठे विधान केले आहे. “दुष्काळ पडलेला आहे, अजिबात कर्ज भरू नका,” असे आवाहन पाटील यांनी केले आहे. जिल्हा बँकेचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी आल्यास, त्यांना थेट आपले नाव सांगावे, असे निर्देश त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
पाटलांनी यावेळी सरकारवर आणि नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले नेते आज सकाळी सकाळी कमोडवर बसतात, तर शेतकऱ्यांचे हाल अजूनही इंडियन पद्धतीनेच चालू आहेत. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सरकारमधील सर्व नेत्यांनी एक पाऊल खाली येऊन शेतकऱ्याच्या झोपडीत काय आहे, शेतकऱ्यांचे दुःख काय आहे, हे प्रत्यक्ष बघावे अशी विनंती पाटील यांनी केली.
यावेळी त्यांनी तरुणांना लढायला शिकण्याचा संदेश दिला. “अडवायला कोणी केला तर सोडवायला शिका आणि घेतली एकी तर आता मोडायला शिका,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
