तुम्ही राणे घ्या, आम्ही भुजबळ घेतो! छगन भुजबळांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशामागचं राजकारण

भुजबळ पक्षात पुन्हा येण्यामागच्या नफा तोट्याची समीकरणं पक्षात सोडवली जात आहेत. भुजबळांना पक्षात घेण्यासाठी उद्धव ठाकरे अनुकूल असल्याची चर्चा आहे, पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा भुजबळ यांना पुन्हा शिवसेनेत घेण्यास तीव्र विरोध आहे.

तुम्ही राणे घ्या, आम्ही भुजबळ घेतो! छगन भुजबळांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशामागचं राजकारण

मुंबई : ज्या बहुचर्चित शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे तो आणखी लांबणीवर गेला आहे. कारण छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चाचपडत आहेत.

राज्याच्या राजकारणात भाजपच्या सोबतीने स्थान भक्कम झाल्याने अनेकांना शिवसेनेत घरवापसीचे वेध लागले आहेत. शिशिर शिंदे, शरद सोनावणे, विलास तरे, दिलीप सोपल यांनी पुन्हा शिवसेनेत येऊन आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात आता प्रतीक्षा आहे ती मूळचे शिवसैनिक असलेल्या दोन बहुचर्चित पक्षप्रवेशांची. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं आहे. अलिकडेच त्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन जुने मतभेद संपुष्टात आणले. पण छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्यावरुन पक्षात सध्या मोठा खल सुरु आहे.

भुजबळ पक्षात पुन्हा येण्यामागच्या नफा तोट्याची समीकरणं पक्षात सोडवली जात आहेत. भुजबळांना पक्षात घेण्यासाठी उद्धव ठाकरे अनुकूल असल्याची चर्चा आहे, पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा भुजबळ यांना पुन्हा शिवसेनेत घेण्यास तीव्र विरोध आहे. त्यासाठी भूतकाळात झालेला संघर्ष आणि बाळासाहेबांवर राजकीय आकसाने भुजबळांनी केलेल्या कारवाईचा संदर्भ या नेत्यांकडून दिला जात आहे. पण भुजबळांची राजकारणातील वरिष्ठता प्रस्थापितांना डोईजड ठरणं, ही विरोधामागची खरी गोम असल्याचं सांगितलं जातं.

भुजबळांची येवला, नांदगाव आणि उत्तर नाशिक या तीन जागांची शिवसेनेकडे मागणी आहे. पण शिवसेनेतील प्रस्थापितांकडून नांदगावमध्ये भुजबळ यांचे चिरंजीव पंकज यांचा पराभव करुन दाखवू, असा दावा केला जात आहे. त्यामुळे फक्त एका येवला या जागेसाठी भुजबळ यांना पक्षात घेऊन काय साध्य होणार? अशी भूमिका या प्रस्थापितांनी उद्धव ठाकरेंपुढे मांडली आहे. पण जिंकून येणे हा एकमेव निकष आणि प्रत्येक जागा महत्वाची ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे.

पक्षात एका विरोधी गटाने तर भुजबळ हवेत तर मग नारायण राणे का नकोत? अशीही टोकाची भूमिका मांडल्याचं कळतं.

पक्षात उत्तर महाराष्ट्रातील काही आमदारांना भुजबळ आल्यास त्यांच्या राष्ट्रीय स्तरावर असलेल्या ओबीसींच्या नेते पदाचा निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं. पण बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात तुरुंगात गेलेल्या भुजबळ यांची काळी बाजूही आहे. भाजप हा प्रतिष्ठेचा मुद्दा करु शकतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश यांना पक्षात घेण्यास इच्छुक आहेत. शिवसेना राणेंच्या भाजप प्रवेशावर आक्षेप घेऊ शकतं. अशावेळी तुम्ही राणेंना पक्षात घ्या, आम्ही भुजबळांना पक्षात घेतो असा तोडगा निघू शकण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्वतः भुजबळ यांनी मात्र त्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाचं खंडन केलं आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमचं ठरलंय’ असा कितीही छातीठोक दावा केला तरी दोन्ही नेते यंदा गाफील नाहीत. यदा कदाचित युती तुटली तर त्यासाठी भुजबळ किंवा राणे हे कारण ठरले नाही म्हणजे मिळवलं.

निवडणुकीत स्ट्राईक रेट ज्याचा जास्त तो पक्ष वरचढ… त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपशी असलेल्या स्पर्धेत उद्धव ठाकरेंना त्यांचे राजकीय विरोधकही पक्षात हवेहवेसे वाटू लागले आहेत. त्यासाठी प्रसंगी छगन भुजबळांच्या बाबतीत कट्टर शिवसैनिकांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका ते पत्करणार का? हा कळीचा मुद्दा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *