नाराजी वरिष्ठांकडे मांडायची, मीडियासमोर नाही, भाजपच्या बैठकीपूर्वी विखेंचा टोला

मला वाटत नाही की नाराजी माझ्याबद्दल आहे. पण ज्यांची नाराजी आहे, त्यांनी ती वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, असं विखे पाटील म्हणाले

नाराजी वरिष्ठांकडे मांडायची, मीडियासमोर नाही, भाजपच्या बैठकीपूर्वी विखेंचा टोला


मुंबई : नाराजी वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, मीडियासमोर नाही, असं म्हणत भाजपवासी झालेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली तक्रार करणाऱ्या भाजप नेत्यांना टोला लगावला. भाजप नेत्यांची मुंबईत बैठकीत आयोजित करण्यात आली असून ‘पाडापाडी’चा आरोप असलेल्या विखे पितापुत्रावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे (Radhakrishna Vikhe Patil BJP Meeting).

‘मला वाटत नाही की नाराजी माझ्याबद्दल आहे. पण ज्यांची नाराजी आहे, त्यांनी ती वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, प्रसारमाध्यमांसमोर सांगायची गरज नव्हती. पक्षाला फायदा झाला की नाही, त्याबद्दल वरिष्ठ सांगतील, पक्षात एवढं मोठं काय झालं, असं मला वाटत नाही’ असं राधाकृष्ण विखे पाटील ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पक्षश्रेष्ठींना खुश करण्याचा प्रयत्न करतात, पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतात तेच निर्णय ते घेतात, ते वेगळे असं काही करत नाही’ असा टोलाही विखेंनी थोरातांना लगावला.

पक्षविरोधी काम केल्याचा आरोप, विखे पिता-पुत्रांवर भाजप कारवाई करणार?

‘नागरिकत्व हा देण्याचा कायदा आहे काढून टाकण्याचा कायदा आहे. सत्तेच्या सारीपाटासाठी शिवसेनेला ठरवायचं आहे या कायद्यासंबंधी काय करायचं. हे सरकार अपघाताने आलेलं आहे. त्यांच्या मंत्रीपदावर मी काय बोलणार’ असंही विखे म्हणाले.

दरम्यान, आमची जी काही नाराजी आहे ती आजच्या बैठकीत सांगितली जाईल, विखेंमुळे आणि त्यांच्या चुकांमुळे पक्षाचा पराभव झाला, असा आरोप माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केला आहे. पक्षाच्या झारीतील शुक्राचार्यांची चौकशी झालीच पाहिजे, वरिष्ठ त्यावर नक्की निर्णय घेतील, असा विश्वास भाजप नेते वैभव पिचड यांनी व्यक्त केला.

या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित आहेत.

यापूर्वीही नाशिक विभागाच्या बैठकीत राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रावर आरोप केले होते. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या बैठकीत सर्वच पराभूत आमदारांनी विखे यांना लक्ष्य केलं होतं. “पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्यांचा पराभव झाला,” अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. त्यामुळे बैठकीत विखे पिता-पुत्र आणि भाजपातील पराभूत आमदारांच्यात समन्वय साधला जातो की त्यांच्यावर कारवाई केली जाते याकडे सध्या सर्वांच लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यानंतर राम शिंदे यांच्यासह पाच माजी आमदारांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या विरोधात पक्षप्रमुखांकडे तक्रारी केल्या होत्या. राज्यात सत्ता गेल्याने आता भाजपला पक्षातंर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे, भाजपमध्ये सध्या अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळते. आता यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे (Radhakrishna Vikhe Patil BJP Meeting).

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI