पारनेरच्या बाळासाहेब गुंजाळ यांनी करुन दाखवलं, तैवान पिंक पेरु शेतीतून 40 लाखांची कमाई

बाळासाहेब गुंजाळ यांनी तैवान पिंक पेरुतून 40 लाखांचं उत्पन्न घेतलय अजून 20 लाख मिळण्याची त्यांनी आशा आहे. (Balasaheb Gunjal Taiwan Pink Peru Farming)

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 14:16 PM, 25 Feb 2021
पारनेरच्या बाळासाहेब गुंजाळ यांनी करुन दाखवलं, तैवान पिंक पेरु शेतीतून 40 लाखांची कमाई
बाळासाहेब गुंजाळ, प्रगतीशील शेतकरी

अहमदनगर: पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याला पेरूच्या बागेतून तब्बल 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पारंपरिक पिकांना फाटा देऊन फळ शेतीकडे वळणाऱ्या बाळासाहेब गुंजाळ या शेतकऱ्याला चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे दिसतंय. विशेष म्हणजे कमी पाण्यात आणि कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. नगरला पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे बाळासाहेब गुंजाळ यांच्या दहा एकर पेरू शेतीतून त्यांनी अवघ्या 14 महिन्यात 40 लाखाचे उत्पन्न घेतल आहे. तसेच आणखी तीन महिन्यांमध्ये त्यांना 20 लाखाचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. बाळासाहेब गुंजाळ यांनी तैवान पिंक नावाच्या पेरूच्या शेतीतून प्रगती साधलीय. (Balasabeb Gunjal earn forty lakh rupees from Taiwan Pink Peru Farming)

कमी पावसात येणारं फळ पीक म्हणून पेरुची निवड

पारनेर तालुका हा तसा कमी पावसाचा आणि डोंगराळ भाग असलेला तालुका आहे. या भागात शेतीची वेगवेगळी पिके घेतली जातात परंतु, फारसे उत्पन्न मिळत नाही. पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे असलेल्या बाबासाहेब गुंजाळ यांना 35 एकर शेती आहे. या शेतीतील दहा एकरावर त्यांनी वर्षभरापूर्वी तैवान पिंक नावाच्या पेरूची लागवड केलीय. एकरी साधारण साडेआठशे झाडं तर दहा एकरात साडेआठ हजार झाडांची लागवड करण्यासाठी त्यांना साडेसात ते आठ लाख रुपयांपर्यंत खर्च आला. पेरूच्या लागवडीनंतर अवघ्या आठ महिन्यातच पेरूचे उत्पादन सुरू झालंय.चार महिन्यापासून गुंजाळ यांनी त्यांच्या बागेतून 40 लाखांचे पेरू विकले आहेत आणि आणखी चार महिन्यात साधारण वीस लाखांचे पेरू मिळतील, असं बाळासाहेब गुंजाळ यांनी सांगितलं आहे.

मऊ आणि गोडीला कमी असल्यानं तैवान पिंक पेरुला मागणी

तैवान पिंक ही नवीन पेरूची जात असून या पेरू ला मोठी मागणी आहे. साधारण 400 ते 900 ग्रॅम पर्यंत वजन असलेला हा पेरू अतिशय मऊ आणि गोडीला कमी आहे. त्यामुळे याला मागणी जास्त आहे. शिवाय पेरूच्या टिकण्याची क्षमता देखील चांगली असल्यामुळे लांबच्या बाजारपेठेत पेरू पाठवण्यासाठी कोणतीही अडचण येत नाहीय. त्यामुळे उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता फारच कमी आहे, असंही बाळासाहेब गुंजाळ म्हणाले.

दररोज ठिबक सिंचनाद्वारे पाणी

पेरू बागेचे नियोजन करण्यासाठी बाळासाहेब यांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. पेरूची बाग लावतानाच शेणखत आणि कोंबडी खत या बागेला दिले आहे. रोज एकरी अर्धा तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. पीक दर्जेदार येण्यासाठी कोणत्याही रासायनिक खताची गरज लागत नाही, त्यामुळे नियोजन करण्यासाठी तैवान पिंक पेरू हे पिक सध्यातरी अत्यंत फायदेशीर आहे, बाबासाहेब गुंजाळ म्हणतात.

कमी खर्चात कमी कष्टात आणि साध्या जमिनीवर बाबासाहेब गुंजाळ यांनी घेतलेलं, तैवान पिंक पेरूचे हे पिक त्यांना मोठा नफा मिळवून देत आहे. गुंजाळ यांच्या प्रमाणेच शेतकऱ्यांनी अशा पिकांची निवड करून चांगलं उत्पन्न मिळवण गरजेचे आहे.


संबंधित बातम्या:

सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती, पाडवी बंधुंची लाखोंची कमाई

नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये

(Balasabeb Gunjal earn forty lakh rupees from Taiwan Pink Peru Farming)