कपाशीवर मोठं संकट, हवामान खात्याचा इशारा काय?; पाऊस येणार की ब्रेक घेणार?
8 जूनला मृग नक्षत्र सुरू झालं आहे, मात्र तरीही राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पीकं धोक्यात आली आहेत.आता आगामी काळात पाऊस पडणार का? हे जाणून घेऊयात.

राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 8 जूनला मृग नक्षत्र सुरू झालं आहे, मात्र तरीही राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पीकं धोक्यात आली आहेत. बरेच शेतकरी 15 मे नंतर कपाशी लागवड करत असतात. यंदाही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आगामी काळात पाऊस पडणार का? हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
मान्सून पुन्हा सक्रीय
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी राज्यातील हवामानाबाबत बोलताना म्हटले की, मान्सून चार ते पाच दिवसापासून सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकणात गेले 3 दिवस मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे.
पुढचे आठ दिवस कसे असेल हवामान?
एस डी सानप यांनी आगामी हवामानाच्या अंदाजावर भाष्य करताना म्हटले की, ‘पुढच्या आठ दिवसाचा विचार करता कोकण आणि घाटमाथ्यावर येणारे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात विजांच्या गडगडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा संदेश
एस डी सानप यांनी सांगितले की, “पेरणीसाठी शेतकऱ्यांनी वापसा आलेला आहे का? जमिनीत किती ओलावा आहे याचा विचार करावा आणि त्यानंतर पेरणीचा निर्णय घ्यावा. तसेच कृषी विभागाकडून ज्या काही सूचना शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्या पाळणे गरजेचे आहे.”
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
गोंदिया जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने दडी मारली होती. मात्र आज अखेर गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे जिल्ह्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेत पावसामुळे खरीप हंगामासाठी मशागतीला वेग येणार असून, शेतकऱ्यांना आता पेरणी करता येणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
