झेंडूला प्रतिकिलो विक्रमी 150-200 रुपयांचा दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न

साताऱ्यातील एका शेतकऱ्यानं अवघ्या 3 महिन्यात 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे (Profit in Zendu Merigold Flower farming).

झेंडूला प्रतिकिलो विक्रमी 150-200 रुपयांचा दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न

सातारा : उत्तर कोरेगाव हा सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला प्रदेश आहे. याच भागातील सोळशी येथे एका शेतकऱ्यानं अवघ्या 3 महिन्यात 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे (Profit in Zendu Merigold Flower farming). याला कारणंही असंच आहे. सध्या झेंडूच्या फुलांना ऐतिहासिक दर मिळत आहे. सध्या बाजारात प्रतिकिलो झेंडूच्या फुलांना 150 ते 200 रुपये दर मिळत आहे. जालिंदर सोळस्कर असं या प्रगतशील शेतकऱ्याचं नाव आहे.

जालिंदर सोळस्कर यांनी यंदा जिद्दीच्या जोरावर खडकाळ माळरानावर झेंडूची बाग फुलवली. त्यांनी 1 एकरात आतापर्यंत 3 महिन्यात 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी साधारण दिवाळीपर्यंत झेंडूचं 30 टन उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

कोरोनामुळे एप्रिल महिन्यापासुन सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. शेतकरीही मोठा हवालदिल झाला आहे. मात्र शेतीचे योग्य नियोजन आणि बाजारपेठेतील आवक लक्षात घेऊन शेतीत चांगले उत्पादन घेतल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरते. हे तंत्र अवलंबून साताऱ्याच्या जालिंदर सोळस्कर यांनी सोळशी येथील त्यांच्या 1 एकर क्षेत्रामध्ये झेंडूचे उत्पन्न घेतलं. यासाठी त्यांनी सर्व प्रथम उभे आडवे 2 वेळा रोटर मारुन एकरी 4 ट्रॉली शेणखत शेतात टाकले. यानंतर पीक वाढीस लागण्यासाठी त्यांनी Dap,Prome,10.26.26 या खतांचे मिश्रण करुन शेतात टाकले.

लॉकडाऊन काळात 20 मे रोजी उन्हाळ्यातच त्यांनी कलकत्ता सीड्स झेंडूची 7000 हजार रोपे मागवून दीड फुटावर त्याची लागवड केली. तसेच ह्यूमिक अॅसिड आणि कार्बन डायजिनद्वारे ड्रिचिंग आळवणी केले. झेंडूची लागवड उन्हाळ्यात केल्यामुळे त्याची विशेष काळजी सोळस्कर यांनी घेतली. पिकाला पाणी आणि लागवडीनंतर 20 दिवसांनी दर 8 दिवसाला बुरशीनाशक, कीटकनाशकाची फवारणी केली. ठिबकद्वारे झेंडूसाठी लागणारे पाणी आणि विद्राव्ये खते दिल्याने याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि फुलांमध्ये दिसून आला.

लागवडीनंतर 45 दिवसांनंतर झेंडूची फुले तोडणीस सुरुवात झाली. लॉकडाऊन शिथिलतेनंतर श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात या झेंडूच्या फुलांना चांगली मागणी वाढल्याने पुणे येथील गुलटेकडी येथे त्यांना 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने भाव मिळाला. मे महिन्याच्या लागवडीपासून आतापर्यंत त्यांना या फुलांमधून 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजुन दिवाळीपर्यंत 10 लाख रुपयांच्यावर उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

जालिंदर सोळस्कर यांना झेंडू पिकाच्या लागवडीसाठी 1 एकर क्षेत्रात 1 लाख रुपये खर्च आला. या खर्चासह त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर खडकाळ माळरानावरही सोने पिकवून दाखवले. त्यातून त्यांनी लाखोंचा नफा मिळवला. तसेच उत्पादन आणि विक्रीचे योग्य नियोजन करुन शेती फायदेशीर ठरु शकते हेच त्यांनी यातून दाखवून दिले.

हेही वाचा :

Wardha Farmers | पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद

…अन्यथा कोरोनातील बळींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील, सरकारनं भान ठेवावं : राजू शेट्टी

आधी कोरोनाचा कहर, आता पावसाचा अंदाज, पुढील पाच दिवसात गारपिटीसह पावसाचे संकेत

Profit in Zendu Merigold Flower farming

Published On - 7:53 pm, Sun, 23 August 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI