तुमच्या कारची काळजी कशी घ्यावी ? ‘हे’ भन्नाट उपाय आजवर कुठेच वाचले नसतील!
कार घेतल्यानंतर तिची योग्य निगा राखणं अत्यंत गरजेचं असतं. फक्त सर्व्हिसिंग पुरेसं नसतं, काही खास टिप्स आणि स्मार्ट उपाय तुमच्या कारचं आयुष्य वाढवू शकतात. या लेखात जाणून घ्या असेच काही उपयोगी आणि अनोखे ट्रिक्स!

उन्हाळा तापला की घराबाहेर पडणं जसं अवघड होतं, तसंच आपल्या कारलाही या उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा वेळी कार जर थोड्या वेळासाठीही उन्हात उभी राहिली, तर ती आग ओकू लागते. इंजिन तापतं, आतलं वातावरण गरम होतं आणि प्रवासाचा आनंद निघून जातो. पण काही सोप्या गोष्टींची काळजी घेतली, तर तुमची कार उन्हाळ्यातही थंड आणि सुरक्षित राहील. चला, पाहू या पाच महत्त्वाच्या टिप्स, ज्या तुमच्या कारला गर्मीपासून वाचवतील.
1. उन्हाळ्यात कारचं इंजिन जास्त तापतं. कारण, बाहेरची उष्णता आणि इंजिनची स्वतःची उष्णता . यापासून संरक्षणासाठी कूलेंट महत्त्वाचं आहे. कूलेंट इंजिनला थंड ठेवतं आणि ओव्हरहिटिंग टाळतं. यासाठी दर दोन आठवड्यांनी कूलेंटची पातळी तपासा. जर पातळी कमी असेल, तर कारच्या मॅन्युअलनुसार योग्य कूलेंट लावा. स्वस्त कूलेंट वापरणं टाळा, कारण यामुळे इंजिनला नुकसान होऊ शकतं. तसंच, कार तीन वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल, तर रेडिएटरची सर्व्हिसिंग करून घ्या.
2. रेडिएटर कारचं इंजिन थंड ठेवण्यासाठी हवा फिरवतं. पण उन्हाळ्यात धूळ आणि कचरा रेडिएटरच्या पंख्यांमध्ये अडकतो. यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि इंजिन तापतं. रेडिएटरच्या पंख्यांवर धूळ साचली असेल, तर मऊ ब्रश किंवा कॉम्प्रेस्ड एअरने ती स्वच्छ करा. रेडिएटरच्या नळ्या आणि कॅपमध्ये गळती किंवा झीज आहे का, हेही तपासा. स्वच्छ रेडिएटर तुमच्या कारला गर्मीच्या तडाख्यातही चांगली कामगिरी करायला मदत करेल.
3. उन्हात उभी असलेली कार काही मिनिटांतच तापायला लागते. आतलं वातावरण असह्य होतं आणि इंजिनवरही ताण येतो. शक्य असेल तिथे कार झाडाखाली, गॅरेजमध्ये किंवा सावलीत पार्क करा. सावली नसेल, तर कारवर बॉडी कव्हर वापरा. हे कव्हर कारचं रंग आणि आतलं सामान सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतं. तसंच, पार्किंग करताना खिडक्या अर्धा इंच उघड्या ठेवा. यामुळे हवा खेळती राहील आणि आतली उष्णता कमी होईल.
4. उन्हाळ्यात कारचं एअर कंडिशनर (एसी) तुमचा सोबती आहे. पण सतत वापरामुळे त्याच्यावर ताण येतो. एसीच्या फिल्टरमध्ये धूळ साचली असेल, तर हवेचा प्रवाह कमी होतो आणि थंडावा मिळत नाही. प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला एसीची सर्व्हिसिंग करून घ्या. रेफ्रिजरंटची पातळी, कॉम्प्रेसर आणि बेल्ट तपासा. कार सुरू करताना पहिली १५ मिनिटं एसी फ्रेश एअर मोडवर चालवा. यामुळे आतली गरम हवा बाहेर जाईल आणि एसीला जास्त मेहनत करावी लागणार नाही.
5. कारच्या आतली उष्णता कमी करण्यासाठी सनशेड आणि सोलर ब्लाइंड्स खूप उपयुक्त आहेत. विंडशील्ड आणि खिडक्यांवर सनशेड लावा. हे सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि आत येणारी उष्णता कमी करतात. यामुळे डॅशबोर्ड, सीट्स आणि स्टीअरिंग व्हीलचं नुकसान टाळलं जातं. सनशेड लावल्याने एसीला कार थंड करण्यासाठी कमी वेळ लागतो. हलक्या रंगाचे सनशेड निवडा, कारण ते जास्त उष्णता शोषून घेत नाहीत.
