वाहन धारकांसाठी खूशखबर! रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर करणे झाले सोपे

वाहनधारकाच्या मृत्यूनंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर करणे त्रासदायक प्रक्रिया ठरत होती. ही प्रक्रिया आता सोपी झाली आहे. (Good news for vehicle owners, Transferring the registration certificate has become easy)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:15 AM, 3 May 2021
वाहन धारकांसाठी खूशखबर! रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर करणे झाले सोपे
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर करणे झाले सोपे

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने देशभरातील वाहनधारकांसाठी मोठी खूशखबर दिली आहे. सरकारने मोटार वाहन नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर करणे सोपे झाले आहे. ही प्रक्रिया सुलभ, सोपी करण्याच्याच दृष्टीकोनातून सरकारने 1989 च्या मोटार वाहन नियमावलीमध्ये काही बदल केले आहेत. कोणत्याही वाहनाच्या मालकाला यापुढे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सहज ट्रान्सफर करता येईल. वाहनधारकाच्या मृत्यूनंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर करणे त्रासदायक प्रक्रिया ठरत होती. ही प्रक्रिया आता सोपी झाली आहे. (Good news for vehicle owners, Transferring the registration certificate has become easy)

रजिस्ट्रेशनवेळी किंवा नंतर ऑनलाईन वारसाचे नाव टाकता येणार

वाहनमालक आता वाहनाच्या रजिस्ट्रेशनवेळी वारसाचे नाव टाकू शकणार आहे किंवा नंतर ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून वारसाचे नाव नोंदवू शकणार आहे. आधीची प्रक्रिया किचकट आहे तसेच संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रकारची आहे. अधिसूचित नियमांअंतर्गत वारस व्यक्तीचे नाव नोंदवले गेले असेल तर वाहनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर वारस व्यक्तीला स्वत:च्या ओळखीचा पुरावा म्हणून संबंधित कागदपत्र सादर करावे लागेल. वाहनधारकाच्या मृत्यूनंतर पुढील तीन महिन्यांत वाहनाचा अशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो, जसे की संबंधित वाहन त्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यात आले आहे.

30 दिवसांच्या आत वाहनधारकाच्या मृत्यूची माहिती देणे बंधनकारक

वाहनधारकाचा अचानक कोणत्याही कारणावरून मृत्यू झाल्यास वारस म्हणून नेमण्यात आलेल्या व्यक्तीने पुढील 30 दिवसांच्या आत रजिस्ट्रेशन प्राधिकरणाला वाहनधारकाच्या मृत्यूची माहिती देणे बंधनकारक आहे. त्याचवेळी संबंधित वाहनाचा यापुढे आपण स्वत: वापर करणार असल्याचे रजिस्ट्रेशन प्राधिकरणाला कळवावे लागेल. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या परिपत्रकात याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आणखी काही महत्त्वपूर्ण बाबी नमूद केल्या आहेत. वारस म्हणून नेमलेली व्यक्ती किंवा वाहनाच्या मालकी हक्क प्राप्त करणारी व्यक्तीला वाहनधारकाच्या मृत्यूनंतर पुढील तीन महिन्यांच्या आत रजिस्ट्रेशन प्राधिकरणाकडे फॉर्म नं. 31 च्या रुपात अर्ज करावा लागेल.

विशिष्ट परिस्थितीत वारसाचे नाव बदलता येणार

केंद्रीय मंत्रालयाने तलाक तसेच संपत्ती विभागणीवरून उद्भवणाऱ्या वादाच्या वेळी कोणती प्रक्रिया पार पाडली पाहिजे, याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. अशा परिस्थितीत वाहनधारक वारस म्हणून नेमलेल्या व्यक्तीच्या नावात बदल करू शकतो. वाहनधारक एक सहमत मानक संचालन प्रक्रियेच्या (एसओपी) माध्यमातून वारसाच्या नामांकनामध्ये बदल करू शकतो. केंद्रीय मंत्रालयाच्या नियमांत बदल करण्याच्या या भूमिकेने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया जाणकारांकडून दिली जात आहे. (Good news for vehicle owners, Transferring the registration certificate has become easy)

इतर बातम्या

जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचे अल्पशा आजाराने निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास