Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 36 टक्क्यांची वाढ

टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) कंपनीने फेब्रुवारी महिन्याचा सेल रिपोर्ट (विक्री अहवाल) जारी केला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:17 PM, 2 Mar 2021
Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 36 टक्क्यांची वाढ
toyota-fortuner

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) कंपनीने फेब्रुवारी महिन्याचा सेल रिपोर्ट (विक्री अहवाल) जारी केला आहे. कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, फेब्रुवारी 2021 मध्ये भारतीय बाजारात Toyota ने एकूण 14,075 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. तर फेब्रुवारी 2020 मध्ये टोयोटाच्या एकूण 10,352 युनिट्स वाहनांची देशांतर्गत बाजारात विक्री झाली होती. जर आपण मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याशी तुलना केली तर या महिन्यात टोयोटाच्या विक्रीत 36% वाढ झाली आहे. जानेवारी 2021 च्या तुलनेत या कालावधीत कंपनीच्या विक्रीत फेब्रुवारी महिन्यात वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये टोयोटाने एकूण 11,126 वाहने भारतीय बाजारात विकली होती. (Toyota Kirloskar Motor registered 36 percent sales growth in february 2021)

दरम्यान, मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि ह्युंदाय मोटर इंडियासह (Hyundai Motor India) अनेक कंपन्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. फेब्रुवारी महिना वाहन क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरला आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. दरम्यान, मारुती सुझुकी, अशोक लेलँड, बजाट ऑटो, ह्युंदाय मोटर इंडियाने त्यांच्या सेलचे आकडे जाहीर केले आहेत. फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत फेब्रुवारी 2021 मध्ये मारुती सुझुकीच्या विक्रीत 11.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

बजाज ऑटोच्या विक्रीत 6 टक्क्यांची वाढ

दुचाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटोने सोमवारी सांगितले की फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या वाहनांची एकूण विक्री 6 टक्क्यांनी वाढून 3,75,017 वाहनांवर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी याच महिन्यात त्यांनी 3,54,913 वाहने विकली होती. फेब्रुवारी महिन्यात कंपनीची देशांतर्गत बाजारात होणारी विक्री 2 टक्क्यांनी घसरून 1,64,811 वाहनांवर गेली, गेल्या वर्षी कंपनीने याच महिन्यात 1,68,747 वाहनांची विक्री केली होती.

कंपनीने म्हटले आहे की, फेब्रुवारीत त्याचा निर्यात व्यवसाय 13 टक्क्यांनी वाढून 2,10,206 वाहनांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी 1,86,166 वाहने निर्यात केली होती. बजाज ऑटो कंपनीची दुचाकींची विक्री फेब्रुवारीमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 3,32,563 वाहनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 3,10,222 दुचाकींची विक्री केली होती. कंपनीच्या व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री 5 टक्क्यांनी घसरून 42,454 वाहनांवर गेली आहे, त्या तुलनेत एक वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने 44,691 व्यावसायिक वाहनांची विक्री केली होती.

अशोक लेलँडच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ

हिंदुजा समूहाची अग्रणी कंपनी अशोक लेलँडकडून सोमवारी सांगण्यात आले आहे की, की फेब्रुवारी महिन्यात त्यांची विक्री 19 टक्क्यांनी वाढून 13,703 वाहनांवर गेली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी याच महिन्यात त्यांनी 11,475 वाहनांची विक्री केली होती. या कालावधीत कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री 12,776 वाहनांची होती, जी मागील वर्षी 10,612 वाहने इतकी होती. यात एकूण 20 टक्के वृद्धी पाहावयास मिळाली आहे.

कंपनीने म्हटले आहे की मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री देशांतर्गत बाजारात 5 टक्क्यांनी वाढून 7,114 वाहनांवर गेली आहे, तर मागील वर्षी ती 6,745 वाहने इतकी होती. फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री 5,662 वाहने इतकी नोंदवण्यात आली आहे, तर फेब्रुवारी 2020 मध्ये ती 3,867 वाहने इतकी होती. यात 46 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

ह्युंदायच्या विक्रीत वाढ

ह्युंदाय मोटर इंडियाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात निर्यातीसह त्यांच्या एकूण विक्रीत 26.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये विक्री झालेल्या 48,910 युनिट्सच्या तुलनेत कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण विक्री 61,800 वाहनांची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या देशांतर्गत विक्रीतही या महिन्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात विक्री झालेल्या 40,010 युनिट्समध्ये यंदा 29 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीने यंदा 51,600 वाहनांची देशांतर्गत बाजारात विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीनी निर्यात 14.6 टक्क्यांनी वाढली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीने 8,900 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. तर यंदा कंपनीने 10,200 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे.

संबंधित बातम्या

Toyota Fortuner आणि Legender चा मार्केटमध्ये जलवा, एका महिन्यात ग्राहकांकडून हजारो गाड्यांचे बुकिंग