मोठी बातमी: एपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट

Edible Oil | शेंगदाणा तेल प्रतिकिलो 180 वरून 150 रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल प्रतिकिलो 170 रुपयांवरून 140 रुपये झाले, सोयाबीन तेल प्रतिकिलो 160 रुपयांवरून 130 रुपये झाले तर पाम तेल प्रतिकिलो 155 रुपयांवरून 155 रुपये झाले आहे.

मोठी बातमी: एपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट
खाद्यतेल दर

नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशात खाद्यतेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला असून त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत होता. हीच बाब ओळखून केंद्रसरकारने खाद्यतेलाची (Edible oil) मोठ्या प्रमाणात आयात सुरू केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसत आहे. परिणामी मुंबई एपीएसमी मसाला मार्केटमध्ये तेलांची किंमतीत प्रतिकिलो 30 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी खरेदीला येणाऱ्या ग्राहकांना वाढत्या महागाईत चांगलाच दिलासा मिळाला आहे. आयातीमुळे गेल्या महिन्याभरापासून गगनाला पोहोचलेल्या खाद्यतेलाचे किंमती आता खाली येत आहेत. (Edible oil prices at APMC Market Navi Mumbai)

भारतात 60 टक्के खाद्यतेल आयात केले जाते, तर 40 टक्के तेल भारतात तयार होते. कोरोनाकाळात बाहेरगावी होणाऱ्या तेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेलाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. शिवाय भारतात तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने तेलाच्या किमती जवळपास 40 टक्क्यांनी वाढल्या होत्या. मात्र, आता तेलाचे उत्पादन वाढले असून केंद्र सरकारने तेल्याच्या आयातीवरील आयात शुक्ल कमी केल्याने खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तर सध्या तेलाच्या दरात यापेक्षा पाच ते दहा रुपये अजून कमी होण्याची शक्यता असल्याचे तेलाचे घाऊक व्यापारी महेश गेडे यांनी सांगितले.

सद्यस्थितीत कॉटन तेलाचे बाजारभाव स्थिर असून शेंगदाणा तेल प्रतिकिलो 180 वरून 150 रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल प्रतिकिलो 170 रुपयांवरून 140 रुपये झाले, सोयाबीन तेल प्रतिकिलो 160 रुपयांवरून 130 रुपये झाले तर पाम तेल प्रतिकिलो 155 रुपयांवरून 155 रुपये झाले आहे.

केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुक्ल घटवले

मोदी सरकारने पाम तेलासह (Palm Oil) विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रती टन 8000 रुपयांची (112 डॉलर्स) कपात केल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाचे (Edible Oils) भाव प्रचंड वाढले होते. खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने सामान्यांच्या मासिक खर्चाचा ताळमेळ बिघडला होता. भारताकडून 70 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळत होता. मात्र, मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव सामान्य पातळीवर येईल, असा अंदाज आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रती टनामागे 86 डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन 37 डॉलरची कपात केली आहे. तर पाम तेलावरील आयात शुल्क प्रती टनामागे 112 डॉलर्सनी घटवण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांची चिंता वाढली होती. यानंतर केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते.

संबंधित बातम्या:

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

(Edible oil prices at APMC Market Navi Mumbai)