स्वस्त मिळतं म्हणून गोल्ड लोन घेतच सुटू नका, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नंतर होईल पश्चाताप
तुम्ही काही कारणास्तव गोल्ड लोन घेणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. घाईगडबडीत गोल्ड लोन घेणं तुमच्यासाठी अवघड होऊ शकतं. गोल्ड लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. जाणून घेऊया.

सोनं हे केवळ दागिने नाही तर लोकांची संपत्ती आहे. कठीण काळात सोन्याचा वापर करता येतो. बरेच लोक सोन्याचा वापर करून आपल्या पैशाच्या गरजा पूर्ण करतात, ज्याला सामान्यत: गोल्ड लोन म्हणून ओळखले जाते. याविषयी पुढे विस्ताराने वाचा.
गोल्ड लोनमध्ये एखादी व्यक्ती आपले सोने गहाण ठेवून पैशांची व्यवस्था करते. जर तुम्हीही काही कारणास्तव गोल्ड लोन घेणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. घाईगडबडीत गोल्ड लोन घेणं तुमच्यासाठी अवघड होऊ शकतं. गोल्ड लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, जाणून घेऊया.
गरज समजून घ्या
गोल्ड लोन घेण्यापूर्वी तुमच्या गरजांचा विचार करा. कठीण काळातच गोल्ड लोन घ्या. कपडे, कार किंवा प्रवास सारख्या छोट्या गरजा भागवण्यासाठी कधीही गोल्ड लोन घेऊ नका. याशिवाय नंतर पैसे भरा आणि तुमचे सोने परत घ्या.
गोल्ड लोन कसे मिळते?
तुमचे सोने 18 कॅरेटपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले तर तुम्हाला गोल्ड लोन मिळणार नाही. 18 ते 22 कॅरेटच्या सोन्यावरच कर्ज मिळू शकते. बँकेकडून किती कर्ज मिळणार हे कॅरेटनुसार ठरवले जाते. समजा तुमचं सोनं 18 कॅरेट आहे आणि त्याची किंमत 1 लाख आहे, तर बँक तुम्हाला 65 हजारांचं कर्ज देऊ शकते, तुम्हाला 22 कॅरेटवर जास्त कर्ज मिळू शकतं. सोन्याच्या शुद्धतेच्या आधारेच कर्ज मंजूर केले जाते. वेगवेगळ्या बँका आणि एनबीएफसी (नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्या ) त्यानुसार कर्जाची रक्कम ठरवतात.
गोल्ड लोनचे व्याजदर
बँका आणि एनबीएफसी या दोन्ही कंपन्यांकडून गोल्ड लोन दिले जाते. सर्वसाधारणपणे बँकेकडून गोल्ड लोनवर कमी व्याज दर मिळतो. त्याचबरोबर एनबीएफसीमध्ये जास्त व्याजदराने कर्ज दिले जाते. अशावेळी कर्ज घेण्यापूर्वी सगळीकडून व्याजदर शोधून बँक किंवा एनबीएफसीची काळजीपूर्वक निवड करा.
‘ही’ माहिती अतिशय महत्त्वाची
गोल्ड लोन घेण्यापूर्वी जर तुम्ही कर्ज फेडू शकत नसाल तर तुमच्या सोन्याचे काय केले जाईल याची माहिती असणे आवश्यक आहे. साधारणत: गोल्ड लोनची परतफेड 3 महिन्यांपासून 3 वर्षांपर्यंत असते. अशावेळी सोने जाऊ नये म्हणून आपल्या आर्थिक स्थितीनुसार कालावधी निवडा.
कर्ज घेताना ‘हे’ शुल्क आकारले जाते
गोल्ड लोनमध्येही इतर सामान्य कर्जांप्रमाणे प्रोसेसिंग फी असते. बँक आणि एनबीएफसी (नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी) नुसार ही फी वेगवेगळी असते. गोल्ड लोन घेताना प्रोसेसिंग फीवरही जीएसटी आकारला जातो. याशिवाय व्हॅल्युएशन चार्ज, सर्व्हिस चार्ज असे इतर ही काही खर्च असतात.