रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा तेजी, जून तिमाहीत मालमत्तांची दुप्पट विक्री

Home Loan | ICAR च्या माहितीनुसार, गृहकर्जाचा व्याजदर हा गेल्या काही वर्षांतील निच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनेकजण घरखरेदीसाठी उत्सुकता दाखवत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दैनंदिन व्यवहार कमी प्रमाणात ठप्प झाले होते.

रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा तेजी, जून तिमाहीत मालमत्तांची दुप्पट विक्री
रिअल इस्टेट

मुंबई: कोरोना संकटामुळे गर्तेत फसलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आता पुन्हा एकदा सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण नुकत्याच सरलेल्या जून तिमाहीत मालमत्तांच्या विक्रीचे प्रमाण दुप्पट झाल्याची माहिती समोर आली आहे. देशातील आठ प्रमुख शहारांमध्ये नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत 6.85 कोटी वर्ग फूट इतक्या घरांची विक्री झाली. मे महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जून तिमाहीत गेल्यावर्षीच्या तुलनेत घर विक्रीचे प्रमाण कमी असले तरी ते दिलासादायक असल्याचे सांगितले जाते.

गेल्या आर्थिक वर्षाती शेवटच्या तिमाहीत 8.47 कोटी वर्ग फूट इतक्या घरांची विक्री झाली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याने ग्राहकांनी घर खरेदीकडे पुन्हा पाठ फिरवली होती. परंतु, गेल्या काही काळात लसीकरणाचा टक्का वाढल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. ICAR या रेटिंग एजन्सीच्या माहितीनुसार, 2020-21 मधील पहिल्या तिमाहीत 3.37 कोटी वर्ग फूट घरांची विक्री झाली होती. या तुलनेत यंदाच्या जून तिमाहीत घरांची विक्री दुप्पट झाली आहे. लसीकरणाचा वेग आणखी वाढल्यानंतर अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येईल. त्यामुळे आगामी काळात घरविक्रीचे प्रमाण आणखी वाढेल, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

गृहकर्जाचा व्याजदर निच्चांकी पातळीवर

ICAR च्या माहितीनुसार, गृहकर्जाचा व्याजदर हा गेल्या काही वर्षांतील निच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनेकजण घरखरेदीसाठी उत्सुकता दाखवत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दैनंदिन व्यवहार कमी प्रमाणात ठप्प झाले होते. त्यामुळे मोजके व्यवहार वगळता इतर गोष्टी सुरु राहिल्या. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला झाला.

आयटी क्षेत्राकडून मागणी

कोरोनाकाळात बहुतांश क्षेत्रांना फटका बसला असला तरी आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस आले होते. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली. या सगळ्याचा फायदा घरबांधणी क्षेत्रालाही झाला आहे.

मुंबईत मे महिन्यात 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना आणि अर्थव्यवस्था आक्रसलेली असताना मुंबईत मात्र नव्या मालमत्तांची खरेदी जोरात सुरु असल्याचे दिसून आले होते. कारण, मे महिन्यात मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात (MMRA) तब्बल 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री व्यवहार झाल्याचे समोर आले होते.

30 मे 2021 रोजी सीआरई मॅट्रिक्स प्रॉपर्टी ट्रॅकर आणि आयजीआर महाराष्ट्र कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मे 2021 मध्ये मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद रु. 10979 कोटी इतकी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 22,507 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये एमएमआर मध्ये नोंदणीकृत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रू. 44167 कोटी, रु. 21696 कोटी आणि रु. 21484 कोटी इतके झाले.

30 मे 2021 पर्यंत मुंबईत मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद मे 2021 मध्ये रु. 7246 कोटी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 16250 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये मुंबईत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रु. 28961 कोटी, रु. 12989 कोटी आणि रु. 12890 कोटी इतके झाले.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा रिअल इस्टेट मार्केटला फटका, घरांच्या विक्रीत 23 टक्क्यांनी घट

भारतात सर्वात महाग आणि स्वस्त घरं कोणत्या शहरात?

लॉकडाऊन काळात कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ, बांधकाम क्षेत्राला जबर फटका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI