सगळ्या कर्जाची परतफेड करावी की, पैसे कुठेतरी गुंतवावे? फायद्याचं काय
अनेकदा कर्जाची एकदाच परतफेड करावी की कुठेतरी गुंतवणूक करावी, असा प्रश्न अनेकदा पडतो. मात्र या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे.

Loan Repayment Or Investment : आजकाल बहुसंख्य लोक कर्ज काढूनच खराची खरेदी करतात. काढलेल्या कर्जाची नंतर पुढे कित्येक वर्षे परतफेड करावी लागते. त्यासाठी प्रत्येक महिन्याल ईएमआय भरावा लागतो. मात्र कर्जाची परतफेड करताना प्रत्येकालाच प्रिपेमेंट करून घराचे पूर्ण कर्ज फेडून टाकावे की कुठेतरी पैशांची गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवावा? असा प्रश्न पडतो. खरं म्हणजे या प्रश्नाचे ठोस असे उत्तर नाही. तुमची आर्थिक परिस्थिती, जोखीम घेण्याची कुवत यावर सगळं काही अवलंबून आहे. हेच समजून घेऊ या….
घराचे कर्ज लवकर संपवणे कधी फायदेशीर आहे?
तुमच्या घराचा व्याजदर जास्त असेल. म्हणजेच तो साधारण 9 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्या कर्जाची परतफेड जेवढे लवकर शक्य होईल, तेवढ्या लवकर करणेच सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या गृहकर्जावरील व्याज 9 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही प्रिपेमेंट न करता गुंतवणूक केली तर तुम्हाला मुदत ठेव, किंवा अन्य कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीतून मिळणारे व्याज हे तुम्ही कर्जासाठी देत असलेल्या व्याजापेक्षा कमी असेल. त्यामुळे गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता कमी असेल. यासह तुम्हाला तुमचे घर लवकरत लवकर तुमच्या नावावर हवे असेल, तुम्हाला कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचे नसेल तर कर्जाची लवकरात लवकर परतफेड करणेच सर्वोत्तम पर्याय आहे. निवृत्तीची वेळ जवळ येत असेल आणि तुमच्या नोकरीबाबत अनिश्चितता असेल तर कर्जाची लवकरात लवकर परतफेड करण्याचाच पर्याय निवडावा.
परतफेड न करता गुंतवणूक कधी करावी?
तुम्ही घर खरेदी करताना घेतलेल्या कर्जाचा व्याजदर 7 टक्क्यांपर्यंत असेल तर तुम्ही प्रिपेमेंट न करता गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. कारण म्युच्युअल फंडासारख्या पर्यायामध्ये गुंतवणूक केल्यास सरासरी 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे म्हटले जाते. त्यामुळे गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा प्रिपेमेंटच्या मदतीने होणाऱ्या बचतीपेक्षा जास्त असू शकतो. मात्र ज्या लोकांचे निश्चित आणि नियमित असे उत्पन्न आहे, त्याच लोकांनी हा पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते.
मिश्र पद्धतही वापरू शकता
दरम्यान, काही गुंतवणूकदार वेळ मिळेल तेव्हा कर्जाचे प्रिपेमेंट तसेच कधी-कधी गुंतवणूक करण्याचाही पर्याय निवडू शकतात. त्यामुळे सर्व बाबींचा योग्य तो अभ्यास करूनच तुम्ही योग्य तो पर्याय निवडायला हवा.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)
