गुंतवणूक कमी, पण तगड्या रिटर्नची हमी, कोणती योजना देईल सर्वाधिक परतावा, एका क्लिकवर जाणून घ्या
Investment Scheme : दिवाळी आली की अनेकजण त्यांच्या पुढील वर्षासाठी एखादी चांगली गुंतवणूक योजना शोधतात. देशात गुंतवणुकीसाठी अनेक योजना आहेत. गुंतवणूकदारांना परताव्यासाठी जोखीम सुद्धा नको असते. तेव्हा हे दोन पर्याय चांगले ठरू शकतात.

RD vs SIP Investment : भारतीय लोक नेहमी कमाईसोबत बचत आणि गुंतवणुकीवरही बारीक लक्ष ठेऊन असतात. दिवाळी आली के ते जोखीममुक्त अथवा कमी जोखीम असलेल्या योजनांचा तपास करतात. त्यात गुंतवणुक किती फायद्याची याचा हिशेब मांडतात. बचतीसाठी अनेक योजना आहेत. पण जर चांगला परतावा हवा असेल तर मात्र पारंपारिक योजनांचा पर्याय पुरेसा नाही. तुम्हाला गुंतवणुकीसाठी त्यापेक्षा वेगळा पर्याय शोधावा लागेल. त्यातून अधिकचा परतावा मिळेल. त्यादृष्टीने हे दोन पर्याय फायदेशीर ठरू शकतात.
काही गुंतवणूकदारांना जास्त रिस्क नको असते आणि एका ठराविक रिटर्नची त्यांना अपेक्षा असते. तर दुसरीकडे असे पण गुंतवणूकदार असतात, ज्यांना जास्त रिटर्न हवा असतो आणि त्यासाठी ते जोखीम घ्यायला पण घाबरत नाहीत. भारतीय बाजारपेठेत त्यादृष्टीने दोन गुंतवणूक योजना चर्चेत आहेत. कोणत्या आहेत त्या दोन योजना?
पोस्ट ऑफिस वा बँकेची आरडी (RD)
आवर्ती मुदत ठेवीचा पर्याय अनेकांना आवडतो. कारण त्यात जोखीम नसते. एकरक्कमी गुंतवणूक करावी लागत नाही. ही योजना पोस्ट ऑफिस वा बँकेत सुरु करता येते. आरडीत विविध बँकाचे व्याज दर मिळतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक टक्का अधिक व्याजदर मिळतो. तर काही खासगी बँका पार 8 टक्क्यांपर्यंत व्याज दर देतात. पण त्यासाठी अटी आणि शर्ती असतात. त्या वाचूनच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. साधारपणे 6 ते 7.5 टक्क्यांपर्यंत आरडीवर व्याज मिळते.
टपाल खात्यातील आरडीचा कालावधी 5 वर्षांचा असतो आणि तो वाढवता येतो. एका किमान रक्कम अथवा कमाल रक्कम गुंतवून तुम्हाला आरडी सुरू करता येते. या दरम्यान तुम्ही आरडी मोडली तर त्यांच्या नियमाप्रमाणे तुम्हाला रक्कम परत मिळते. त्यात मोठा तोटा होण्याची शक्यता असते. पोस्टाची आरडी सुरु करण्यासाठी टपाल खात्यात जावे लागते. त्यासाठी सध्या ऑनलाईनचा पर्याय नाही.
तर विविध बँकेच्या आरडी योजना अधिक लवचिक असतात. त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो. ही आरडी सुरु करण्यासाठी त्या बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नसते. तुम्ही त्या बँकेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेवा आणि अटी तपासून घरबसल्या आरडी सुरू करु शकता. आरडी सुरू झाल्यावर नियमितपणे तुम्हाला त्याचे रिमाईंडर पाठवण्यात येते.
Mutual Fund SIP
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखिमेची असते. दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून, SIP द्वारे या योजनेत गुंतवणूक करता येते. पण बाजारातील चढउताराचा या गुंतवणूकदारांना सामना करावा लागतो. या योजनेत गुंतवणूक करताना धैर्य आणि संयम अत्यंत महत्त्वाचा असतो. दीर्घ गुंतवणुकीत SIP मध्ये 12 ते 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतो. अर्थात परताव्याची ही काही पक्की हमी नसते. बाजारानुसार परतावा कमी जास्त होऊ शकतो. पण दीर्घकाळ गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.
डिस्क्लेमर : कोणतीही गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी त्या योजनेचा अभ्यास करा. डोळे झाकून गुंतवणूक करु नका. गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या. बाजारातील गुंतवणूक योजनांमध्ये जोखीम आणि इतर गोष्टींचा परिणाम होतो.
