LIC ची खास योजना! महिलांना दरमहा मिळणार 7000 रुपये, वाचा सविस्तर
एलआयीसीने 'एलआयसी विमा सखी योजना' सुरू केली आहे. कंपनीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांना दरमहा उत्पन्न मिळवण्याची संधी मिळणार आहे.

LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयीसीने ‘एलआयसी विमा सखी योजना’ सुरू केली आहे. कंपनीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांना दरमहा उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि आर्थिक समस्या सुटतील. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महिलांना एजंट बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार
एलआयसी विमा सखी या योजनेचा उद्देश महिलांना एलआयसी एजंट म्हणून नियुक्त करणे हा आहे. यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला एजंट बनल्यास त्यांच्यासाठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होणार आहे. या महिला एजंटद्वारे आसपासच्या गावांमध्ये विम्याबद्दल जागरूकता पसरवण्याचे काम केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत, विमा सखींना विशेष प्रशिक्षण आणि आर्थिक प्रोत्साहन आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे.
दरमहा 7000 रुपये मिळणार
एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत, ज्या महिला एजंट बनल्या आहेत, त्यांना कामगिरीच्या आधारे पहिल्या 3 वर्षात दरमहा स्टायपेंड दिली जाणार आहे. या महिलांना पहिल्या वर्षी दरमहा 7000 रुपये निश्चित वेतन दिले जाणार आहे. त्यानंतर, दुसऱ्या वर्षी दरमहा 6000 रुपये दिले जाणार आहेत. मात्र या 6000 रुपयांसाठी काही अटी असणार आहे. एखाद्या महिलेने पहिल्या वर्षी सुरू केलेल्या एकूण पॉलिसींपैकी किमान 65 टक्के पॉलिसी दुसऱ्या वर्षीही सुरू राहिल्या तर तिला दरमहा 6000रुपये दिले जाणार आहेत.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?
एलआयसी सखी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 70 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. अर्जदार महिलेचे शिक्षण किमान 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. मात्र विद्यमान एलआयसी एजंट किंवा कर्मचाऱ्यांशी संबंधित महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. म्हणजेच पती/पत्नी, मुले (जैविक, दत्तक, सावत्र, अवलंबित किंवा नसलेले), पालक, भावंडे आणि सासू-सासरे हे यासाठी अर्ज करु शकणार नाहीत. निवृत्त कर्मचारी आणि माजी एजंट देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, तसेच विद्यमान एजंट देखील या योजनेसाठी अपात्र असेल.
