प्रशासन काय करत आहे?; स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप
सोशल मीडियावर एका अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत स्वारगेट अत्याचार प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याने थेट 'प्रशासन काय करत आहे?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.

विद्येच आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असणाऱ्या पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर एका नराधमाने बलात्कार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेने पुणे हादरले आहे. राज्यातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, एका मराठी अभिनेत्याने थेट ‘प्रशासन काय करत आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर अभिनेता आदिश वैद्यने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने स्वारगेट येथे घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. तसेच त्याने भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘आपली न्यायव्यवस्था इतकी कमकुवत झाली आहे का? की या प्रकरणाची कोणीही नोंद घेत नाही. याबद्दल कोणीही चर्चा करत नाही. एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये घडलेल्या गोष्टीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. मग अशा गोष्टींची दखल का घेतली जात नाही याचा संताप होऊ लागला आहे. प्रशासन काय करत आहे? यावर मला नेहमीच प्रश्न पडतो. स्वारगेटला एका बसमध्ये मुलीला दरवाजा बंद करुन कोंडलं जातं आणि तिच्यावर अत्याचार होतो. हे किती भीषण आहे’ असे आदिश वैद्य म्हणाला.
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला, ‘आपण फक्त घडलेल्या गोष्टी पाहात असतो. त्यामुळे लोकांना याबद्दल काहीच वाटत नाही. जोवर आपल्या घरी आपल्या आई, बहिणींसोबत काही होत नाही तोवर आपल्याला दुसऱ्यांचा यातना, दु:ख कळत नाही असं आहे का? खूप वाईट वाटतं मला हे बोलताना. पण, मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेकांना असच वाटतं. जोपर्यंत आपल्या घरात अशा गोष्टी घडत नाही तोपर्यंत चलता है चलने दो… पण ती लांब नाही आहे. कारण, या गोष्टी तुमच्या घरापर्यंत येतील तेव्हा तुम्ही रडत बसाल.’
काय आहे प्रकरण?
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने एका २६ वर्षीय युवतीवर अत्याचार केला. बस स्थानकावर घडलेल्या या प्रकरणानंतर आरोपी अजूनही पोलिसांना सापडला नाही. सकाळी ५.३० वाजता घडलेल्या या घटनाचा गुन्हा संध्याकाळी दाखल झाला. तोपर्यंत आरोपी त्याच्या गावात फिरत होता. परंतु त्याला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर तो फरार झाला. आरोपीच्या शोधासाठी सर्वच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तांत्रिक विश्लेषणसोबत १३ टीम त्याच्या शोधासाठी बाहेर पडल्या आहेत. ड्रोन कॅमेऱ्यामार्फत आरोपीचा शोध घेतला जात आहे.
