अहमदनगरमध्ये पीएसआयची हातभट्टीवर धडक कारवाई, 3 लाखांची गावठी दारु नष्ट

अहमदनगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

अहमदनगरमध्ये पीएसआयची हातभट्टीवर धडक कारवाई, 3 लाखांची गावठी दारु नष्ट
maharashtra police

अहमदनगर : अहमदनगरला तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांनी गावठी दारु अड्डयांवर धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 3 लाखांची गावठी दारु आणि त्याला लागणारे रसायन नष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर तालुक्यातील वाळकी, साकत, खडकी, निमगाव वाघा, नेप्ती या ठिकाणी गावठी दारुचे अड्डे सुरु होते. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली.

दारुच्या भट्टया उद्ध्वस्त करत लाखों रुपयांची दारु नष्ट करण्यात आली. या प्रकरणी दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

बुलडाण्यात बाईकचोरांना अटक

दुसरीकडे, बुलडाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून बाईक चोरणाऱ्या चोरट्यांचा तपास लावून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील एकूण नऊ मोटारसायकल जप्त करण्यास मलकापूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली असून आणखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातून मागील काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीच्या घटना घडत होत्या. या प्रकरणात तक्रारी वाढल्याने पोलिसांनी चोऱ्यांचे तपास करत बाळु उर्फ कडुबा अंबादास सांगळे (रा. खंडाळा मकरध्वज) आणि बिस्मिल्ला खा इनायत खा (रा. मलकापुर) या दोघांना ताब्यात घेतले होते.

दोघांकडे कसून चौकशी केली असता मलकापुर शहरातील तसेच बुलडाणा जिल्ह्यातील इतर ठिकाणांवरुन चोरुन लपवून ठेवलेल्या आणि चोरुन विक्री केलेल्या सात मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. तर यावेळी कुणाल राजेंद्र झनके, मलकापुर याला सुद्धा ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात यश आले आहे. असे आरोपींकडून एकूण नऊ मोटार सायकल, अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

भंगारात सापडलेल्या स्कॉचच्या बाटल्यांतून बनावट मद्याची विक्री, मुंबईच्या दोघांना पुण्यात अटक

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून दागिने-पैशांची चोरी, मिरा रोडमधून मायलेकाला अटक

(Ahmednagar PSI Rajendra Sanap raid on illegal liquor shops)