WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन मेसेज, अल्पवयीन तरुणी भेटायला, गाडीत बलात्कार

दिल्लीतील दिलशाद गार्डन मेट्रो स्टेशनजवळ तरुणीवर बलात्कार झाल्याचा कॉल बुधवारी रात्री जवळपास साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिसांना आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा 17 वर्षीय पीडित तरुणीसोबत तिची बहीण आणि आई होत्या.

WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन मेसेज, अल्पवयीन तरुणी भेटायला, गाडीत बलात्कार
प्रातिनिधीक फोटो

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर अल्पवयीन तरुणीला अनोळखी युवकाचा मेसेज आला. दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. त्यानंतर तरुणाने तिला नोकरीचं आमिष दाखवत भेटण्यासाठी दिल्लीतील दिलशाद गार्डन मेट्रो स्टेशनवर बोलावलं. मात्र यावेळी युवकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने आपल्यावर तीन वेळा अत्याचार (Delhi Rape) केल्याचा दावा पीडितेने केला आहे.

तिसऱ्या दिवशी पीडित तरुणीने मदतीसाठी आपली ताई आणि आई यांना घटनास्थळी बोलावलं. मात्र आरोपी गाडीतून पसार झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी बलात्कार आणि पॉक्सो अॅक्टच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. शाहदरा जिल्ह्यातील पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथकं तैनात केली आहेत, मात्र आरोपी हाती लागलेला नाही.

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील दिलशाद गार्डन मेट्रो स्टेशनजवळ तरुणीवर बलात्कार झाल्याचा कॉल बुधवारी रात्री जवळपास साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिसांना आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा 17 वर्षीय पीडित तरुणीसोबत तिची बहीण आणि आई होत्या. पीडिता सुलतानपुरी भागात तिच्या कुटुंबीयांसोबत राहते.

पीडितेचा दावा काय?

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आपल्याला अनोळखी नंबरवरुन एका युवकाचा मेसेज आला. त्यानंतर त्याचा फोनही आला. त्याने आपलं नाव विजय भारती असल्याचं सांगितलं, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. तरुणाने आपल्याला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. 27 नोव्हेंबरला आपण त्याला भेटायला गेलो, तेव्हा तो निळ्या रंगाच्या कारमधून आला, असं पीडितेने सांगितलं. कारमध्ये बसवून आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

तीन वेळा बलात्कार

त्यानंतर पुन्हा एकदा भेटायला बोलावून आरोपीने कारमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. इतकंच नाही, तर बुधवारी पुन्हा बोलावून कारमध्ये आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला. यावेळी संधी साधून आपण बहिणीला कॉल केला. आई आणि बहीण दिलशाद गार्डन मेट्रो स्टेशनजवळ आल्या, त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हातावर तुरी देऊन कारमधून पसार झाला, असा दावा पीडितेने केला आहे.

यावेळी मायलेकींनी आरोपीच्या कारचा फोटो काढला. कार नंबरच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी करुन बलात्कार आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच, पुण्यात 28 वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक अटकेत

फेसबुक फ्रेण्डकडून हॉटेल रुममध्ये बलात्कार, अश्लील व्हिडीओ शूट करत 10 लाखांची मागणी

पतीची हत्या करुन मृतदेह शेतात जाळला, हिंगोलीत पत्नीसह दोन मुलं जेरबंद

Published On - 10:05 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI