विश्वासघातकी मैत्रीची चोरटी कथा, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे बिंग फुटलं, चोरीचा हार घालणं पडलं महागात
पुण्याजवळील राजगुरुनगरमध्ये एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीवर विश्वासघात करून लाखोंचे दागिने चोरले. पीडितेला या चोरीचा शोध वर्षभर लागला. मात्र, व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये दागिने दिसल्यावर ही चोरी उघड झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि तिने गुन्हा कबूल केला आहे. हा प्रकार सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

जिला जीवाभावाची मैत्रीण मानलं, सुख दु:ख शेअर केलं, त्याच मैत्रिणीने दगा देत लाखोंचे दागिने पळवल्याची धक्कादायक घटना पुण्याजवळील राजगुरुनगर शहरात घडली आहे. विश्वासघातकी मैत्रीचं बिंग फुटल्यामुळे खळबळ माजली असून एका महिलेने तिच्याच जवळच्या मैत्रीणीचे अने दागिने चोरल्याचे उघड झाले. मात्र व्हॉट्सॲपच्या स्टेटसमुळे त्या महिलेचा भांडाफोड झाला आणि पोलिसांनी अखेर चोरी करणाऱ्य महिलेला अटक केली आहे. शितल वायदंडे (वय ३३) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
राजगुरुनगर शहरातील पडाळवाडी येथे आर्य रेसिडेन्सी मध्ये रहाणा-या दोन मैत्रिणींचा एकमेकींमधील विश्वासाच्या नात्यावर उभ्या असलेल्या मैत्रीचाच गैरफायदा घेत, एका महिलेनं मैत्रिणीच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले होते. मिळालेला माहितीनुसार, पुनम आदक या महिलेच्या घरात सतत ये-जा करणारी शितल वायंदडे ही मैत्रीणच या चोरीमागे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पूनम यांच्या अंगठ्या, टॉप्स, मंगळसूत्र, नेकलेस, कानातील झुंबे असे विविध प्रकारचे मौल्यवान दागिने घरातून वर्षभरापूर्वी गायब झाले होते. ते चोरी झाल्यावर पूनम यांनी खूप शोध घेतला. त्यांनी नातेवाईकांकडे, मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली मात्र ते दागिने काही सापडले नाहीतच. पूनम यांनी शीतललाही दागिन्यांबद्दल विचारलं होतं, मात्र तिने आरोप सरळ फेटाळून लावले.
व्हॉट्सॲप स्टेटसमुळे झाला भांडाफोड
पण मे 2025 मध्ये शीतलच्या बहिणीचे व्हॉट्सॲप स्टेटस हे पूनम यांनी पाहिलं, तेव्हा त्यांना शीतल व त्यांची बहीण यांच्या अंगावर तेच दागिने दिसले. तसेच कानातले आणि गळ्यातलं होतं. हे पाहून शीतल यांनी खेड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर खेड पोलिसांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या पुराव्यावरून शितल वायदंडे यांना ताब्यात घेतले आणि त्यांना खडसावत चौकशी केली. अखेर शीतल यांनी आपणच चोरी केल्याचे सांगत गुन्ह्याची कबूली दिली. तिच्या कबूलीनंतर पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मैत्रीणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्याच घरी चोरी केल्याचा हा प्रकार सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला असून त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
