राहुल यांचा घातपात झाला… मध्यरात्री अंधारात गाठून गुप्ती, तलवार आणि हॉकी स्टिकने वार, पैलवानाचा जागीच मृत्यू; सांगली हादरली
सांगली जिल्ह्यातील विटा येथे मध्यरात्री एका पैलवानाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. राहुल जाधव या तरुणाची जुन्या भांडणाच्या रागातून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी राहुलला धावत्या कारमधून बाहेर खेचले आणि तलवारीने वार केले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका इसमाला धावत्या कारमधून बाहेर खेचून, त्याच्यावर तलवारीने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची भयानक घटना सांगलीजवळ घडली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा जवळील कार्वे येथे एका पैलवानाचा मध्यरात्री खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहुल जाधव असे मृत तरूणाचे नाव असून गुप्ती व तलवारीने डोक्यात वार करून तसेच हॉकी स्टीकने मारून निर्घृण खून करण्यात आला. एवढंच नव्हे तर राहुल याची कारही यावेळी हल्लेखोरांनी फोडली, कारच्या काचांचा चक्काचूर झाला. ही घटना कार्वे येथे स्मशानभुमी नजीक असलेल्या विटा- तासगांव रस्त्यावरील पुलावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विटा पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जाधव यांचे विटा एमआयडीसीमध्ये कार्वे हद्दीत हॉटेल आणि बार आहे. राहुल यांची हत्या झाल्याची तक्रार त्यांचा भाऊ राजाराम जाधव यांनी विटा पोलिसांत नोंदवली होती. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास राहुल हे नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये गेले होते. मात्र अचानक मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलचा व्यवस्थापक भारत भोसले याने राहुलचा भाऊ राजाराम यांना फोन केला. राहुलचा घातपात झाला,तुम्ही तातडीने मंगळूर रस्त्यालगतच्या हॉटेलवर या’ असे त्यांना सांगण्यात आले. तो निरोप ऐकून राजाराम धास्तावले, पण त्यांनी भावासाठी तिथे धाव घेतली. त्यांना कार्वे ते तासगाव जाणार्या रस्त्यालगत, कार्वे हद्दीतील स्मशानभूमीसमोर पुलावर राहुल यांचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांच्या अंगावर, डोक्यावर तलवारीने सपासप वार करण्यात आले होते, तसेच त्यांची कारही फोडण्यात आली होती, काचांचा खच रस्त्यावर पडला होता.
भावाच्या मृत्यूचे दु:ख उरात दाबत राजाराम यांनी विटा पोलिसांत धाव घेत फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माणिक संभाजी परीट व गजानान गोपीनाथ शिंदे (मंगरुळ ता. खानापूर), अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव (सर्व, कार्वे ता. खानापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तपास करत माणिक परीट, गजानन शिंदे व नयन धाबी या तिघांना अटक केली असून अन्य हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
राहुल जाधव व संशयित आरोपी यांच्यामध्ये झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून, शस्त्र बाळगून राहुल जाधव यांच्या कारच्या काचा फोडल्या. तसेच राहुलवर तलवार आणि गुप्तीने वार करून त्याची हत्या केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले होते. उर्वरित आरोपींनी लवकरात लवकर अटक करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.