पुणे एअरपोर्टवर महिलेचा हाय प्रोफाईल ड्रामा, फ्लाईटमध्ये प्रवाशांशी भांडली, थप्पडही…
पुणे विमानतळावर एका महिलेने फ्लाइटमध्ये हायप्रोफाईल ड्रामा केला. तिला फ्लाइटमधून बाहेर काढल्यावर तिने थेट सीआयएसएफच्या जवानांना थप्पड मारली. पुणे पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

पुणे विमानतळावर एका महिलेने हायप्रोफाईल ड्रामा केल्याचे चित्र पाहायला मिळालं. पतीसोबत पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसलेल्या या महिलेने आधी प्रवाशांशी हुज्जत घातली. क्रू मेंबरने तिला थांबवल्यावर तिने त्यांच्याशीही गैरवर्तन केले. अशा स्थितीत या महिलेला विमानातून बाहेर काढण्यात आले. मात्र सीआयएसएफची महिला शिपाई जेव्हा तिला बाहेर काढू लागली तेव्हा तिने तिलाही जोरदार थप्पड मारली. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे येऊन महिलेला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला गृहिणी असून तिचा पती सॉफ्टवेअर इंजिनीर आहे, तो पुण्यात नोकरी करतो. गेल्या शनिवारी त्या महिलेच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच ते दोघेही पुण्याहून दिल्लीला जात होते. लोहंगाव एअरपोर्टवरून त्यांनी सकाळी 8च्या सुमारासाची फ्लाईट पकडली. मात्र त्या फ्लाईटमध्ये तिने बराच गोंधळ घातला. महिलेला विमानतळावरून अटक केल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याची नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.
तडकाफडकी दिल्लीला जात होती महिला
पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनेला दुजोरा दिला. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत महिलेच्या पतीची भूमिकाही तपासली जात आहे. त्यांनी सांगितले की ही महिला तिच्या पतीसोबत पुण्यात राहते आणि शनिवारी दिल्लीत तिच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे तातडीच्या विमानाने दिल्लीला जात होती. यावेळी महिलेचा विमानात एका प्रवाशासोबत वाद झाला. एअरलाइनच्या क्रू मेंबरने मध्यस्थी केल्यावर तिचीही त्यांच्याशी बाचाबाची झाली.
सीआयएसएफ कर्मचाऱ्यालाही मारली थप्पड
त्यानंतर त्या महिलेला आणि सोबत असलेल्या तिच्या पतीला विमानातून उतरवून सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. सीआयएसएफचे जवान या महिलेला घेऊन जात असतानाच ती महिला सीआयएसएफवर चिडली. काही वेळातच तिने सीआयएसएफ महिला कर्मचाऱ्यालाही थप्पड मारली. यानंतर सीआयएसएफने तात्काळ पोलिसांना बोलावून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
