गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली
सुरज सोळसे यांनी कॅश गाडीत ठेवून गाडी चालू केली असता, एका अनोळखी लहान मुलाने ऑईल गळत असल्याचे त्यांना सांगितले आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे काय घडलं, वाचा

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील बँक कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे तब्बल 50 लाख रुपयांची लूट होताना वाचली. गाडीतून ऑईल गळत असल्याचं खोटं सांगून लहान मुलाने कर्मचाऱ्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतर्कता बाळगत कर्मचाऱ्याने रोकड गाडीत ठेवली आणि 50 लाखांची लूट टळली. कर्जत पोलिसांकडून संबंधित बँक कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
युनियन बँक ऑफ इंडियाचे विशेष सहाय्यक सुरज सोळसे यांनी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कर्जत शाखा येथून 50 लाख रुपयांची रोकड विड्रॉ केली होती. कॅश गाडीत ठेवून गाडी चालू केली असता, एका अनोळखी लहान मुलाने ऑईल गळत असल्याचे त्यांना सांगितले आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.
गाडी तात्काळ मागे घेत कॅश बँकेत जमा
दरम्यान गाडीतून ऑईल येऊ शकत नसल्याबाबत सोळसे यांना विश्वास होता. तसेच आरोपीने ऑईल फेकल्यासारखं त्यांच्या लक्षात आलं होतं. सुरज सोळसे यांनी सतर्कपणा दाखवत कॅश पुन्हा गाडीत ठेवली. गाडी तात्काळ मागे घेऊन कॅश बँकेत जमा केली. सुरज सोळसे यांच्या सतर्कतेमुळे 50 लाख रुपयांची लूट होण्यापासून वाचली.
पोलिसांकडून सतर्कतेचं आवाहन
कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सोळसे यांचा सत्कार केला. त्यांनी कर्जतमधील जनतेला आवाहन केले आहे की, कोणी ऑईल गळत आहे, गाडीचे टायर पंक्चर झाले आहे, असे सांगून किंवा नोटा मोजून देतो असं सांगितलं तर सावधगिरी बाळगा. अंगावर घाण टाकून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतो आणि डिक्कीत ठेवलेले पैसे चोरट्यांकडून लुटण्याचे प्रकार होतात. त्यामुळे जनतेने सतर्कता बाळगावी, असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे.
संबंधित बातम्या :
Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?
साताऱ्यातील पैलवानांसह नाशिकच्या तरुणाचा केरळातील बँकेवर दरोडा, साडेसात किलो सोन्याची लूट
