झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून गोळीबार, रिक्षाने हल्लेखोर पसार, जळगावात खळबळ

या घटनेत 4 ते 5 राऊंड फायर झाले असून घरात आणि आजूबाजूला काडतुसे पडलेली आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळी गावठी पिस्तुल सोडून पळ काढला आहे

झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून गोळीबार, रिक्षाने हल्लेखोर पसार, जळगावात खळबळ
जळगावात गोळीबाराची घटना

जळगाव : जळगाव शहरातील कांचननगर परिसरात सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी कांचन नगरातील रहिवासी सपकाळे कुटुंबीयांच्या घरात घुसून गोळीबार केला आहे. या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव शहरातील कांचननगरात आज सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी कांचननगरातील मध्यवर्ती भागातील एका घरात घुसून, झोपेत असलेल्या 2 भावंडांवर गोळीबार केला. हल्लेखोरांनी 4 ते 5 राऊंड फायर केले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, हाताला गोळी लागून एक जण जखमी झाला आहे. या भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

कांचननगर परिसरात राहणारे मुरलीधर सपकाळे यांच्या घरावर अज्ञात 4 ते 5 हल्लेखोरांनी आज सकाळी गोळीबार केला. मुरलीधर सपकाळे हे घराबाहेर खाटेवर झोपलेले होते. तर त्यांची दोन्ही मुले आकाश व सागर सपकाळे हे घरात झोपलेले होते. रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी घरात घुसून झोपेत असलेले आकाश व सागर यांच्या अंगावरील चादर ओढून, गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्याने दोघे बालंबाल बचावले. झटापटीत आकाशच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला. यावेळी झटापटीत हल्लेखोरांपैकी एक जण खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जबर लार लागला. रक्तस्त्राव झाल्याने तो घटनास्थळीच पडून होता. या प्रकारानंतर हल्लेखोर पळून गेले.

या घटनेत 4 ते 5 राऊंड फायर झाले असून घरात आणि आजूबाजूला काडतुसे पडलेली आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळी गावठी पिस्तुल सोडून पळ काढला आहे. हा हल्ला कुणी आणि का केला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

दोन दिवसांपूर्वीच खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी जामिनावर सुटल्यानंतर दोघांनी गोळीबार करत त्याची हत्या केली होती. या घटनेनंतर लगेचच जळगावात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

जामिनावर सुटलेल्या आरोपीची हत्या

याआधी, भुसावळ तालुक्यातील नशिराबादमध्ये खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे मंगळवारी सायंकाळी वाजता साडेसात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली होती. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत.

जळगावातून दुचाकीने भुसावळला जात होते

धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19) असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव असून, मनोहर दामू सुरळकर (वय 45) असे त्याच्या जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. धम्मप्रिय व मनोहर सुरळकर हे भुसावळ शहरातील पंचशील नगरातील रहिवासी आहेत. ते जळगावातून दुचाकीने भुसावळला घरी जात होते. मात्र, मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अचानकपणे सशस्त्र हल्ला केला. त्यात धम्मप्रियचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धम्मप्रिय खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी

मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2020 रोजी भुसावळ शहरातील पंचशील नगरात एका व्यक्तीचा खून झाला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यात धम्मप्रिय सुरळकर हा संशयित आरोपी होता. त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तसेच तो जळगाव उपजिल्हा कारागृहात होता. त्याला भुसावळच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. कारागृहातून सुटल्यानंतर तो वडिलांसह दुचाकीने जळगावातून भुसावळच्या दिशेने जात होता.

आधी गोळीबार नंतर चॉपरने वार करुन हत्या

मात्र, नशिराबाद येथे महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाखाली त्याच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला. त्यात जखमी झाल्याने दोघे जण दुचाकीवरून जमिनीवर पडले. मारेकऱ्यांनी नंतर धम्मप्रिय याच्यावर चॉपरने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांनी तपास सुरु केलाय.

इतर बातम्या :

जामिनावर सुटताच तुफान गोळीबार, हत्येच्या आरोपातील तरुणाचा सिनेस्टाईल खून, जळगाव हादरलं

25 फुटाच्या भिंतीवरुन उडी, हत्येच्या आरोपातील जेरबंद आरोपीचे पलायन, तळोजा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर ?

आधी बिअर पाजली, नंतर मरेपर्यंत ट्रकखाली चिरडलं, सोबत राहण्याचा हट्ट धरणाऱ्या प्रेमिकेचा शेवटी काटा काढला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI