दारूच्या नशेत ट्रूथ अँड डेअर खेळत नराधमांनी डाव साधला, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने पिंपरी चिंचवड हादरलं
मद्यधुंद अवस्थेत ट्रूथ अँड डेअर हा खेळ खेळत असताना तरूणांनी त्या मुलीशी जवळीक साधत तिच्यावर अत्याचर केला. मात्र तेव्हाच पीडित मुलीच्या नातेवाईकांना फोन लागल्याने त्यांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पीडितेच्या पालकांना या घटनेची माहिती दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या आवारात एका कारने एक महिला आणि लहान बाळाला चिरडलं तर एक महिलेने तिच्या प्रियकराची आपल्याच मित्रांसोबत मिळून हत्या केली. या दोन्ही घटना उघडकीस येताच पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ माजलेली असतानाचा आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळ खेळताना जवळीक साधत नराधम तरूणांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी आणि आरोपी हे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते आणि मद्यप्राशन केल्यावर मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला. एवढंच नव्हे तर त्या वेळेस पीडित मुलीची एक रीलस्टार मैत्रीणही त्याच फ्लॅटमध्ये हजर होती.
हा अत्याचार होत असताना पीडित मुलीचा फोन नातेवाईकांना लागला आणि त्यांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पीडितेच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. आई-वडिलांनी धावपळ करत मुलीला शोधलं आणि त्यानंत रावेत पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. त्या आधारे रावेत पोलिसांनी आरोपी आयुष आनंद भोईटे , सुशील बालद्र ठाकूर , रीतिक संजय सिंग यांना ताब्यात घेतलं आहे.
मद्यधुंद अवस्थेत ट्रूथ अँड डेअर गेम खेळत अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षांची असून ‘नीट’ची परिक्षा देण्यासाठी ती पिंपरी-चिंचवड शहरात रहात होती. काही वर्षांपूर्वी त्या मुलीची 22 वर्षांच्या तरूणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ती मुलगी रीलस्टार आहे. मंगळवार, 21 जानेवारी रोजी त्या मैत्रिणीने पीडित मुलीला फोन करून एका दिवसासाठी घरात रहायला जागा मिळेल का अशी विचारणा केली. तिने हो म्हटल्यानंतर ती रीलस्टार पीडितेचे घरी रहात होती. त्यानंतर ती रीलस्टार मुलगी आपल्या मित्रांसमोर रावेत परिसरात एका पार्टीला गेले होती, तिथे त्या सर्वांनी मद्यप्राशन केलं होतं.
बराच उशीर होऊनही मैत्रीण घरी न आल्याने पीडितेने तिला फोन केला आणि घरी येण्यास सांगितलं. पण तेव्हा आरोपींनी कॉल उचलून तू पार्टीला ये म्हणत पीडित मुलगी राहत असलेल्या पेईंग गेस्ट रूमवर जाऊन तिला पार्टीस्थळी आणलं. एका खाजगी फ्लॅट वर हे सर्व जण मद्यधुंद अवस्थेत ट्रूथ अँड डेअर खेळ खेळत असतानाच आरोपी तरूणांनी पीडित मुलीवर त्याच फ्लॅटच्या बाथरूममध्ये अत्याचार केला.
मात्र हा सर्व प्रकार घडत असताना पीडित मुलीच्या नातेवाईकांना फोन लागला. फोन सुरू असल्याचं पीडित मुलगी किंवा आरोपींच्या, कोणाच्याच लक्षात आले नाही. फोन सुरू असल्याने तिच्या नातेवाईकांना सर्व प्रकार कळला आणि त्यांनी पीडितेच्या आई वडिलांना फोन करून सर्व प्रकार सांगितलं. तिच्या आई-वडिलांनी तातडीने धाव घेत मुलीला सोडवलं आणि नंतर रावेत पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेली घटना कथन करत फिर्याद दिली. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली.
तसेच पीडितेच्या रीलस्टार मैत्रिणीला ही चौकशी साठी बोलावण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपींची नावे आणि अत्याचार झालेले ठिकाण याबाबत काहीच कल्पना नव्हती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मोबाईल आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली. त्यांच्या वर रावेत पोलिस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.
