पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक

राजेश सीएसएमटीला पोहोचल्यानंतर आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्याला त्याच परिसरात असलेल्या एका बांधकामाच्या साईटवर नेले. तिथे त्याची निर्घृण हत्या केली.

पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक
तरुणाच्या हत्या प्रकरणात चौघांना अटक

मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे मुंबईला बोलावून एकाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. बिहारमधून मुंबईत आलेल्या सुरेंदर मंडलला आपल्या पत्नीचे आपल्याच गावात राहणाऱ्या युवकाशी प्रेम संबंध असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे मुंबईत सोबत करणाऱ्या गावच्या मित्रांसोबत कट रचून सुरेंदरने राजेश चौपाल याची हत्या केली होती. (Bihar Man killed out of extra marital affair in Mumbai by Girlfriend’s Husband)

राजेश गावावरुन निघाला, मुंबईतील घरी गेलाच नाही

राजेश चौपाल 14 जून रोजी बिहारहून मुंबईला निघाला होता. पण ट्रेन कुर्ला स्थानकात पोहोचली, तरी राजेश मुंबईतील घरी पोहोचला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली. ही तक्रार दाखल होताच गुन्हे शाखा 5 चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांनी तपास हाती घेतला.

अपहरण करुन बांधकामाच्या साईटवर नेले

राजेशचे अपहरण झाले असून त्याला कुर्ल्याहून सीएसएमटी येथे बोलावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नायर यांनी हाच धागा पकडून आणि खबऱ्यांचे जाळे पसरवून तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरु केला. आरोपींनी राजेशला भेटायला सीएसएमटीला बोलावले होते. त्यामुळे कुर्ला स्थानकात उतरल्यानंतर राजेश टॅक्सीने सीएसएमटीला गेला. तिथे पोहोचल्यानंतर आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्याला त्याच परिसरात असलेल्या एका बांधकामाच्या साईटवर नेले. तिथे त्याची निर्घृण हत्या केली.

मृतदेहाची पाण्याच्या टाकीत विल्हेवाट

राजेशचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून त्यावर 25 किलो मीठ ओतले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान आरोपींनी मयत तरुणाला फोन करून सीएसएमटीला भेटायला बोलावले होते, ही माहिती प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांना मिळाली होती. त्याचाच धागा पकडून आरोपींना अटक करण्यात आली.

बिहार-कर्नाटकातून आरोपींची धरपकड

राजेशचे त्याच्याच गावात राहणारा आरोपी सुरेंद्रच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. सुरेंद्र सध्या बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी राज्याबाहेर पळून गेल्याचे समोर आल्यानंतर दोन पथके तयार करून एक बिहार तर दुसरे पथक कर्नाटकात पाठवले. बिहारमधून सुरेंद्र, शंभू आणि रामकुमार तर कर्नाटकातून त्यांचा मुकादम विजय मिस्त्री याला पकडून आणून गुन्ह्याची उकल करण्यात आली.

संबंधित बातम्या :

विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या

आईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर, प्रियकराकडून बालकाची हत्या

(Bihar Man killed out of extra marital affair in Mumbai by Girlfriend’s Husband)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI