जीम मालकाचा माज, फर्निचर बनवणाऱ्या मजुरांना उपाशीपोटी 24 तास डांबलं, अत्याचाराला वैतागलेल्या कंत्राटदाराचा जीममध्ये गळफास

अमजद खान

अमजद खान | Edited By: चेतन पाटील, Tv9 मराठी

Updated on: Oct 23, 2021 | 9:24 PM

कल्याणमध्ये प्रचंड भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका जीम मालकाने केलेल्या अमानुष दादागिरी, मारहाण आणि धमकीला वैतागून फर्निचर कंत्राटदाराने जीममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

जीम मालकाचा माज, फर्निचर बनवणाऱ्या मजुरांना उपाशीपोटी 24 तास डांबलं, अत्याचाराला वैतागलेल्या कंत्राटदाराचा जीममध्ये गळफास
आरोपी जीम मालक आणि मृतक फर्निचर कंत्राटदार यांचा फोटो

कल्याण (ठाणे) : कल्याणमध्ये प्रचंड भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका जीम मालकाने केलेल्या अमानुष दादागिरी, मारहाण आणि धमकीला वैतागून फर्निचर कंत्राटदाराने जीममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपीने त्याआधी फर्निचर बनवणाऱ्या तीन मजुरांना 24 तास जीममध्ये डांबून ठेवले होते. तसेच दिवाळीच्या आधी फर्निचर न तयार झाल्यास तुझ्या किडन्या विकून पैसे वसूल करु, असा दम आरोपीने मृतक फर्निचर कंत्राटदाराला दिला होता. त्याच्या छळाला वैतागून अखेर पीडित फर्निचर कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे.

संबंधित घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. निष्पाप मजुरांना सलग 24 तास डांबून ठेवून काम करण्याची प्रवृत्ती नेमकी येते तरी कुठून? असा सवाल स्थानिकांच्या मनात उपस्थित होतोय. मजुरांना 24 तास डांबत त्यांना उपाशीपोटी ठेवल्याने त्यांच्या आत्मत्याचा किती कोलाहल झाला असेल? याचा अंदाज आरोपी नराधमाला नसावा. तसेच आरोपीच्या अमानुष दमदाटीला वैतागून घाबरलेल्या कंत्राटदाराने अखेर आत्महत्या केली. या प्रकरणातील आरोपीचं नाव वैभव परब असं आहे. तर आत्महत्या करणाऱ्या पीडित कंत्राटदाराचं पुनमाराम चौधरी असं नाव आहे. या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी तातडीने आरोपी वैभव परब विरोधात गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरात फिटनेस एम्पायर या जीमचे काम सुरु आहे. जीमचे मालक वैभव परब आणि त्याच्या पार्टनरची इच्छा होती की, ही जीम दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुरु झाली पाहीजे. यासाठी सर्व प्रकारची तयारी सुरु होती. जीम मालक परबने फर्निचर तयार करण्याचे काम पुनमाराम चौधरी या कंत्राटदाराला दिले होते. पुनमाराम चौधरी यांनी कामासाठी काही मजूर त्याठीकाणी लावले होते. पण त्यांच्याकडून कामात दिंरगाई होत असल्याचा आरोपीला वाटत होतं.

घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?

या दरम्यान 18 ऑक्टोबरला जेव्हा मजूर राकेश कुमार, गोगा राम आणि सोलाराम हे जीममध्ये काम करण्यास गेले तेव्हा परबने या तिघा मजुराना जीममध्येच कोंडून ठेवले. 24 तास हे तिघे जीममध्ये उपाशीपोटी बंद होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा कंत्राटदार पुनमाराम चौधरी त्याठीकाणी आला. थोड्याच वेळात त्याठिकाणी जीम मालक वैभव परब पोहचला. वैभव परबने पुनमाराम चौधरीला मारहाण केली. तुला जे आगाऊ पैसे दिले आहेत, काम झाले नाही तर तुझी किडणी विकून तुझ्याकडून पैसे वसूल करणार, असं आरोपी म्हणाला. तिघे मजूर दुसऱ्या कामासाठी दुसरीकडे निघून गेले. कंत्राटदार पुनमाराम चौधरी हा जीममध्ये एकटाच कामाला लागला. 19 तारखेला त्याचा मृतदेह जीममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.

पोलिसांकडून आरोपींना बेड्या

या घटनेनंतर आज त्यांचे कुटुंबीय कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले. या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी हरीदास बोचरे पाटील यांनी तपास सुरु केला. अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली वैभव परबच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. आरोपी वैभवमुळे पुनमाराम चौधरी यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने हा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

उल्हासनगरात इस्टेट एजंट्सकडून वृद्धेच्या हत्येचा प्रयत्न, एक आरोपी अटकेत दुसरा फरार

व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग महत्त्वाचा पुरावा, अनन्या पांडेचा जबाब एनसीबी कोर्टासमोर ठेवणार, आर्यनच्या जामिनाला करणार विरोध

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI