भाजी विकण्याच्या जागेवरुन वाद, नालासोपाऱ्यात महिला भाजी विक्रेतीवर चाकूहल्ला

उर्मिला किशोर खडके ही महिला भाजी विक्रेती हल्ल्यात जखमी झाली असून, तिच्या पायावर चाकूचे वार करण्यात आले आहेत. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

भाजी विकण्याच्या जागेवरुन वाद, नालासोपाऱ्यात महिला भाजी विक्रेतीवर चाकूहल्ला
तुळिंज पोलीस स्टेशन

नालासोपारा : भाजी विक्रेती महिला आणि तिच्या सहकाऱ्यावर दुसऱ्या भाजी विक्रेत्याने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजीचा धंदा लावण्याच्या किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप आहे. मुंबई जवळच्या नालासोपारा परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली.

काय आहे प्रकरण?

उर्मिला किशोर खडके ही महिला भाजी विक्रेती हल्ल्यात जखमी झाली असून, तिच्या पायावर चाकूचे वार करण्यात आले आहेत. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नालासोपारा स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजी मार्केट आहे. या भाजी मार्केटमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही निर्माण होते. पण पालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून यावर कारवाई होत नाही.

भाजी विकण्याच्या जागेवरुन फेरीवाल्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात, आता हेच वाद चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचले असल्याने फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही तर हा वाद मोठ्या विकोपाला जाऊ शकतो.

मुंबईत भाजी विक्रेत्याला मारहाण

दुसरीकडे, भाजी विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या तिघा जणांना माटुंगा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 22 ऑगस्टला मुंबईतील माटुंगा परिसरात एका भाजी विक्रेत्याला तिघांनी बेदम मारहाण केली होती. सीसीटीव्ही पडताळल्यानंतर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडित भाजी विक्रेता आधी आरोपी उदयकुमार नाडर याच्या भाजीच्या दुकानात काम करत होता. मात्र लॉकडाऊनमुळे उदयचं दुकान चालत नव्हतं. त्यावेळी पीडित व्यक्तीने दुकान मालकाशी बोलून ते दुकान स्वतः चालवायला घेतलं. याच रागातून त्याला मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी उदयकुमार नाडर, बाळकृष्ण नाडर, आणि रमेश यांना अटक करण्यात आली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. याची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यात पोटच्या मुलांची आईला बेदम मारहाण

दुसरीकडे, पोटच्या मुलांनीच आईचा छळ केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. संपत्तीमधील हिस्सा काढून घेण्यासाठी 58 वर्षीय महिलेचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. आईलाच बेदम मारहाण करणाऱ्या दोघा मुलांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईने सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून द्यावा अशी पीडित महिलेच्या मुलांची आणि इतर नईमाबादी कुटुंबीयांची मागणी होती. पीडित महिला तयार नसल्याने मुलाने आईला खुर्ची फेकून मारली. तसेच इतर कुटुंबीयांनी लाथा – बुक्क्यांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | मुंबईत भाजी विक्रेत्याला मारहाण CCTV मध्ये कैद, तिघांना बेड्या

जालन्यातील तरुणाला केलेली अमानुष मारहाण पोलिसांना भोवली, PSI सह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

भररस्त्यात मारहाण करुन पहिल्या पत्नीचा विनयभंग, माजी नगरसेवकाला अटक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI