नागपुरात 30 दिवसात 19 खून, टीव्ही आणि इंटरनेटवरील क्राईम शोचा परिणाम

ऑरेंज सिटी म्हणून प्रचलित असलेलं नागपूर शहर आता क्राईम सिटी म्हणून प्रचलित होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

  • Updated On - 6:41 pm, Mon, 5 July 21 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
नागपुरात 30 दिवसात 19 खून, टीव्ही आणि इंटरनेटवरील क्राईम शोचा परिणाम

नागपूर : ऑरेंज सिटी म्हणून प्रचलित असलेलं नागपूर शहर आता क्राईम सिटी म्हणून प्रचलित होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यात जून महिन्यातच्या 30 दिवसांमध्ये तब्बल 19 खून झाले आहेत. तर अपहरण घरफोडीच्या घटनासुद्धा पुढे येत आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी काही घटना टीव्ही आणि इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्या क्राईम शो पाहून घडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. (19 murders in 30 days in Nagpur, Bad results of a crime show on TV and Internet)

राज्याच्या उपराजधानीत शांतता नांदावी यासाठी नागपूर पोलीस विभागाकडून गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र अनेक घटना कौटुंबिक कलहातून घडल्या असल्याने पोलिसांचादेखील नाईलाज होतो. नागपूरच्या गुन्हेगारी विश्वाचा इतिहास बघितला तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की, उपराजधानीत खुनाचे सत्र सुरू झाल्यानंतर एका मागे एक खुनाच्या घटना घडत असतात, हा क्रम गेल्या काही वर्षांपासून असाच सुरू आहे. खुनी संघर्षाच्या घटना घडायला सुरवात झाली तर त्या लवकर थांबत नाही. जून महिन्यात सुद्धा नागपूरकरांना याचा अनुभव आला.

जून महिन्यात नागपूर जिल्ह्यात तब्बल 14 खुनाच्या घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये 19 लोकांनी आपला जीव गमावला. यामध्ये एकाच कुटुंबातील 5 सदस्यांचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याची घटनादेखील समाविष्ट आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाच्या अपहरण व हत्याकांडापासून सुरू झालेले हत्यासत्र अजूनही सुरू आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा 15 वर्षीय राज पांडे नामक विद्यार्थ्यांचे त्याच्याच परिचित असलेल्या सुरज रामभूज साहू नामक आरोपीने अपहरण करून खून केला. ही घटना 12 जून रोजी उघडकीस आली. मृतक राजच्या काकांसोबत असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींने राजचे अपहरण करून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. हे कृत्य करण्यापूर्वी आरोपीने इंटरनेटवर अनेक क्राईम शो बघितल्यानंतर षडयंत्र रचले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

एकाच कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या 22 जून रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. धक्कादायक म्हणजे घरातील पाच लोकांना रक्तात लोळवण्यापूर्वी आरोपी गेल्या काही दिवसांपासून टीव्ही आणि इंटरनेट वर क्राईम शो बघत होता. त्यातूनच प्रेरित झाल्यानंतर आरोपींने इतके मोठे हत्याकांड घडवून आणल्याची माहिती पोलिसांच्या तपासात हाती लागली आहे.

5 जून रोजी एका माथेफिरूने चक्क यूट्यूब आणि क्राइम शो बघून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपळा फाटा या भागात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक राजू वैद्य यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून बंधक केले होते. आरोपीने अतिशय सूक्ष्म अभ्यास करून हा संपूर्ण कट रचला होता. मात्र, पोलिसांनी देखील अभेद्य किल्ला भेदून सर्व बंधकांची मुक्तता केली होती.

नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाची दोन ते तीन आरोपींनी मिळून हत्या केल्याची घटना 23 जून रोजी घडली होती. घटनेच्या काही वेळातच योगेशच्या खुनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आरोपी योगेशवर सपासप वार करताना स्पष्ठ दिसून होते. मागील वर्षी जून महिन्यात एकट्या नागपूर शहरात 17 खुनाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षी यामध्ये मोठी घट झालेली असली तरी ग्रामीण नागपूर मध्ये महिन्याभरात पाच खून झाल्याने हा आकडा 18 वर गेला आहे. ही सगळी परिस्थिती बघितली तर ऑरेंज सिटी क्राईम सिटी होत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, मात्र हे सगळं बघता पोलिसांवर गुन्हेगार वरचढ होत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इतर बातम्या

फोनवरुन शिवीगाळ का केली? जाब विचारायला गेलेल्या दोघांची पुण्यात निर्घृण हत्या

वाकडमध्ये 28 वर्षीय महिला पोलिसाची आत्महत्या, पिंपरी चिंचवड पोलिस दलात खळबळ

मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई

(19 murders in 30 days in Nagpur, Bad results of a crime show on TV and Internet)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI