जादूटोणा केल्याच्या संशयातून शिवीगाळ-मारहाण, चंद्रपुरात महिन्याभरातील तिसरी घटना

चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील मोहाडी गावात ही घटना घडली. 49 वर्षीय पीडित व्यक्ती आपल्या घरी असताना याच गावातील विकास गजभे (19) आला. तू माझ्या मोठ्या भावावर जादू केली आहेस, असं म्हणत त्याने शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याचा आरोप आहे

जादूटोणा केल्याच्या संशयातून शिवीगाळ-मारहाण, चंद्रपुरात महिन्याभरातील तिसरी घटना
संग्रहित.

चंद्रपूर : जादूटोणा केल्याचा आरोप करत 49 वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात चंद्रपूरमध्ये जादूटोण्याच्या संशयातून मारहाण होण्याची तिसरी घटना उघडकीस आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील मोहाडी गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 49 वर्षीय पीडित व्यक्ती काल संध्याकाळी आपल्या घरी असताना याच गावातील विकास गजभे (19) घरी आला. तू माझ्या मोठ्या भावावर जादू केली आहेस, असं म्हणत त्याने शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी विकास गजभे याला अटक केली आहे.

जादूटोण्याच्या संशयावरून आधीही मारहाण

जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण होण्याची घटना आधीही चंद्रपुरात समोर आली होती. फिर्यादी असलेला 40 वर्षीय पीडित भाऊ आणि त्याची 38 वर्षीय पीडित बहीण, तसेच त्यांची सत्तर वर्षीय पीडित आई आणि मारहाण करणारे सर्व आरोपी मिंडाळा गावातीलच रहिवासी होते. तक्रारदार भाऊ जादूटोणा करतो आणि त्यामुळे 25 वर्षीय मयुरी सडमाके हिची तब्येत खराब राहते असा आरोप करत प्रमोद सडमाके (35), सीताराम सडमाके (66), मयुरी सडमाके (25), पिल्ला आत्राम (20) आणि चंद्रकला आत्राम (55) अशा पाच जणांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. बहीण आणि वृद्ध आई यांना लाथा-बुक्क्यांनी तर भावाला बांबू आणि बॅटने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला होता.

जादूटोण्याच्या संशयावरून आधीही वृद्धांना मारहाण

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध आणि महिलांना मारहाणीचा प्रकार अवघ्या दहा दिवसांपूर्वीच समोर  आला होता. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द या गावात ही घटना घडली होती. गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली होती. गावातील नागरिक मारहाणीत सहभागी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं.

साहेबराव उके 48, शिवराज कांबळे 74 ,एकनाथ उके 70, शांताबाई कांबळे 53, धम्माशीला उके 38 पंचफुला उके 55, प्रयागबाई उके 64 अशी पीडितांची नावे आहेत.

अंनिसच्या माध्यमातून गावाचे प्रबोधन

पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत पीडितांची सोडवणूक केली होती. पोलिसांनी बारा व्यक्तींविरोधात सुरुवातीला गुन्हे दाखल केले होते. अंनिसच्या माध्यमातून गावाचे प्रबोधन करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO : जादूटोण्याचा संशय, सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांसह 7 जणांना खांबाला बांधून मारहाण

जादूटोण्याच्या संशयातून चंद्रपुरात एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण, भावावर बॅटने वार, बहीण-आईला लाथाबुक्के

बाभळीवर खिळे ठोकले, लिंबू,काळ्या बाहुल्या लटकवल्या; नाशिकमध्ये जादूटोण्याच्या प्रकारामुळे घबराट

पैशाचा पाऊस पाडून 80 कोटी, आमिषाला महिला भुलली, मांत्रिकाकडून मुलीचा शारीरिक छळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI