विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाखांचा घोटाळा, संचालकासह दोघांना दीड वर्षांनी अटक

पतसंस्थेचे अध्यक्ष आणि अभिकर्ता योगेशसिंह शेरसिंह बैस आणि लेखापाल प्रल्हाद राऊत यांनी ठेवीदारांनी ठेवीच्या स्वरुपात जमा केलेली रक्कम कोणत्याही कारणाशिवाय परस्पर स्वार्थासाठी वापरुन घेतली

विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाखांचा घोटाळा, संचालकासह दोघांना दीड वर्षांनी अटक
विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत घोटाळा

गोंदिया : विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाख रुपयाचा घोटाळा केल्या प्रकरणी दीड वर्षांपासून शोध सुरु असलेल्या दोन आरोपींना अखेर बेड्या पडल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी असलेला विदर्भ ग्रामीण पतसंस्थेचा संचालक योगेशसिंग बैस आणि लेखापाल प्रल्हाद राऊत यांचा दीड वर्षांनी शोध लागला.

काय आहे प्रकरण?

गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील साकरीटोला येथे विदर्भ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था उभारण्यात आली. ग्राहकांनी विश्वासाने यात ठेव जमा केली, मात्र संस्थेचे अध्यक्ष आणि अभिकर्ता योगेशसिंह शेरसिंह बैस आणि लेखापाल प्रल्हाद राऊत यांनी या संस्थेच्या ठेवीदारांनी ठेवीच्या स्वरुपात जमा केलेली रक्कम कोणत्याही कारणाशिवाय परस्पर स्वार्थासाठी वापरुन घेतली. एवढंच नव्हे तर बोगस कर्ज वाटपही दाखवले.

दीड वर्ष पोलिसांना हुलकावणी

ही बाब झालेल्या लेखा परीक्षणात स्पष्ट होत तब्बल 1 कोटी 10 लाख 87 हजार 194 रुपयांचा घोटाळा उघड झाला. लेखा परीक्षकाच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध कलम 406, 409,420, 34 भादंवि अन्वये गुन्हा नोंद होता. पोलीस आरोपींना अटक करण्यास गेले असता दोघंही फरार झाले. दीड वर्ष दोघंही आरोपी पोलिसांना हुलकावणी देत राहिले. अखेर दीर्घ काळानंतर पोलिसांना त्यांचा सुगावा लागला आणि दोघेही जेरबंद झाले. या प्रकरणी पुढील तपास सालेकसा पोलीस करत आहेत.

पुण्यात चोरीसाठी एटीएममध्ये स्फोट

दरम्यान, पुणे जिल्ह्यात चाकण एमआयडीसीमध्ये असलेल्या हिताची बँकेच्या एटीएममध्ये स्फोट झाला. चोरीच्या उद्देशाने हा स्फोट घडवला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटात ATM सह समोरील काचांचा चक्काचूर झाला. सुदैवाने या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र एटीएममधून किती रोकड चोरीला गेली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाळुंगे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.

पैसे लुटण्याची नवीन मोडस ऑपरेंडी

जिलेटीनच्या सहाय्याने एटीएम उडवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. स्फोट करत पैसे लुटण्याची नवीन मोडस ऑपरेंडी चोरट्यांनी अंमलात आणल्याचं दिसत आहे. याआधी पुणे जिल्ह्यातच शिरुरमधील रांजणगाव गणपती परिसरात देखील असा प्रकार उघडकीस आला होता.

संबंधित बातम्या :

एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक

पुण्यात हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट, चोरीच्या उद्देशाने एटीएम उडवल्याचा संशय

(Vidarbha Gramin Patsanstha Scam two accuse arrested after one and half year)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI