मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने गावकरी संतापले, प्राण्यांचा बळी देत 40 जणांनी…
ओडिशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगढ़ा जिल्ह्यातील काशीपूर ब्लॉकच्या बैगांगुडा गावात प्रेमविवाहाबाबत लोकांची असलेली मानसिकता समोर आली आहे.

भारतात आजही आंतरजातीय विवाह स्वीकारला जात नाही. असा विवाह केल्याने मुला-मुलींच्या कुंटुंबांना त्रासाचा सामना करावा लागतो. अशातच आता ओडिशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगढ़ा जिल्ह्यातील काशीपूर ब्लॉकच्या बैगांगुडा गावात प्रेमविवाहाबाबत लोकांची असलेली मानसिकता समोर आली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, या गावातील एका मुलीने दुसऱ्या गावातील अनुसूचित जातीच्या मुलाशी लग्न केले. यामुळे मुलीचे कुटुंब आणि तिच्या गावातील लोक तिच्यावर रागावले. हे जातीचे नियमांचे उल्लंघन आहे असं मानून गावकऱ्यांनी मुलीच्या कुटुंबावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला ही प्राण्यांचा बळी देऊन ही प्रक्रिया केली. यात मुलीच्या 40 नातेवाईकांना मुंडन करावे लागले.
प्रेमविवाहासाठी कुटुंबाला शिक्षा
प्राथमिक माहितीनुसार, गावातील लोकांनी मुलीच्या कुटुंबावर दबाव आणला होता, जर त्यांना जातीत परत यायचे असेल तर त्यांना प्राण्यांचा बळी द्यावा लागेल आणि नंतर मुंडन संस्कार करावे लागतील असं गावकऱ्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे समाजाच्या दबावाखाली कुटुंबातील 40 सदस्यांनी मुंडन संस्कार केले.
ही घटना समोर येताच काशीपूरचे बीडीओ विजय सोय यांनी ब्लॉक अधिकाऱ्यांना गावात जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आता तपासानंतरच सत्य बाहेर येणार आहे. तसेच या अधिकाऱ्यांना तपासात कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईही केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात
देशात विविध ठिकाणी आजही जात-पात मानली जास असल्याचे चित्र आहे. समाजात जातीयवाद आणि वाईट प्रथा खोलवर रुजलेल्या आहेत. प्रेमविवाहासारख्या वैयक्तिक निर्णयानंतर शुद्धीकरण प्रक्रियेसाठी दबाव आणणे हे असंवैधानिक असून मानवी हक्कांचेही उल्लंघन आहे. मुंडन संस्कार करतानाचा एक व्हिडिओही समोर आलेला आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
