Pune Andekar Gang : आता आंदेकर गँगचं काही खरं नाही, पुणे पोलीस दलात हालचाली वाढल्या, आता लवकरच…
पुण्यात आयुष कोमकरच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आता याच प्रकरणाील आंदेकर टोळीविरोधात पोलिसांनी कारवाई चालू केली आहे. पोलिसांनी पुण्यात आता मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे.

Pune Crime News : पुण्यात काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या तरुणाची थेट गोळ्या घालून हत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या हत्याकांडामागे आंदेकर टोळी असल्याचे म्हटले जात आहे. या टोळीतील काही लोकांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याविरोधात सध्या खटला चालू आहे. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. दरम्यान, आता आयुषच्या खुनामुळे चर्चेत आलेल्या या आंदेकर टोळीला समूळ नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पोलिसांनी या टोळीविरोधात एकूण दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता आंदेकर टोळीशी संबंधित असणाऱ्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
दोन्ही गुन्हे दाखल, आरोप काय?
कुख्यात आंदेकर टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून पावलं उचलली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार याचाच एक भाग म्हणून समर्थ पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये अनधिकृत बांधकाम आणि खंडणीची मागणी या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 सालापासून आंदेकर टोळीने एका व्यावसायिकाला सतत त्रास देत त्याच्याकडून तब्बल दीड कोटी रुपयांची खंडणी उकळली. व्यवसायात अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच टोळी कडून ‘प्रोटेक्शन’ मिळावे, या कारणावरून ही रक्कम मागण्यात आली होती.
अगोदरच 20 जणांवर मोका अंतर्गत कारवाई
यापूर्वीच बंडू आंदेकरसह 20 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. तरीही नव्या तक्रारी व पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या या पवित्र्यामुळे आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत, असे म्हटले जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या प्रकरणांचा सखोल तपास करणार आहेत. या तपासातून भविष्यात काय निष्पन्न होते? आंदेकर टोळीचे आणखी काही कारनामे उघड होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
