पुण्यात राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी ठुबेला मारहाण, BMW चालकाला अटक करा नाही तर मनसे फोडेल, रुपाली पाटील संतापल्या

कार हळू चालवण्याचा सल्ला देण्यावरुन झालेल्या वादामुळे राष्ट्रीय स्तरावर जुडो रेसलिंग खेळणाऱ्या वैष्णवी ठुबेला (Vaishnavi Thube) बांधकाम व्यावसायिक सुमित टिळेकरने (Sumeet Tilekar) पुण्यातील हडपसर परिसरात जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.

पुण्यात राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी ठुबेला मारहाण, BMW चालकाला अटक करा नाही तर मनसे फोडेल, रुपाली पाटील संतापल्या
पुण्यात राष्ट्रीय क्रीडापटूला बिल्डरची मारहाण

पुणे : बीएमडब्ल्यू कार चालकाने 23 वर्षीय राष्ट्रीय महिला खेळाडूला मारहाण केल्याप्रकरणी मनसेकडून कारवाईची मागणी केली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा, नाहीतर मनसे त्याला फोडेल अशी प्रतिक्रिया मनसे नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्तरावर जुडो रेसलिंग खेळणाऱ्या वैष्णवी ठुबेला (Vaishnavi Thube) बांधकाम व्यावसायिक सुमित टिळेकरने (Sumeet Tilekar) हडपसर परिसरात जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग आल्याने सुमित टिळेकरने दुचाकीस्वार वैष्णवीला मारहाण केली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वैष्णवी ठुबे तिच्या वहिनीसोबत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी बीएमडब्ल्यू कार चालक सुमित टिळेकर वाहतुकीचे नियम मोडून पाठीमागून भरधाव वेगाने जात होता. सिग्नलला गाडी पुढे घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी दुचाकीवर बसलेल्या वैष्णवीच्या वहिनीच्या पायाला गाडीचा धक्का लागला. त्यावेळी वैष्णवीने सुमितला गाडी हळू चालवा, असा विनंतीवजा सल्ला दिला.

आपल्याला कार हळू चालवण्यास सांगितल्याचा राग अनावर होऊन सुमित टिळेकरने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर हडपसर परिसरात फातिमानगर चौकात कार थांबवून त्याने लाकडी दांडक्याने तिच्या पाठीवर, खांद्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये वैष्णवी ठुबेच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

वैष्णवी ठुबे काय म्हणाली?

“मी हातही उचलला नव्हता, ते बाहेर येतानाच डायरेक्ट बांबू घेऊन मला मारहाण करायला लागले. तो फटका माझ्या डोक्यावर बसला असता, पण मी माझा बचाव करुन घेतला. हात मध्ये घातल्याने हाताला दुखापत झाली आहे. मी ज्युडो आणि कुस्ती खेळते. या घटनेमुळे माझ्या कारकिर्दीला ब्रेक लागला आहे.” असं वैष्णवी ठुबे म्हणाली.

रुपाली पाटील काय म्हणाल्या?

“ती मुलगी खेळाडू असल्याने तिने तो मार सहनही केला. पण आर्मी भरती असो किंवा तिचे पुढील सामने, हात तुटल्यामुळे तिचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तुम्ही उर्मट आणि घाणेरड्या वृत्तीच्या माणसांना तातडीने अटक करावी अन्यथा मनसे त्यांना फोडेल” असा इशारा मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी दिला आहे.

“हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवा”

मारहाणीत वैष्णवी ठुबे हिचा हात फ्रॅक्चर झाला असूनही या प्रकारात वानवडी पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचाच फायदा घेऊन आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर वानवडी पोलिसांनी या संदर्भात गंभीर मारहाणीचं कलम वाढवलं. त्यामुळे वानवडी पोलिसांच्या विरोधात वैष्णवी ठुबेने आक्रमक भूमिका घेत आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचे 307 कलम लावावं, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग, पुण्यात BMW चालकाची 23 वर्षीय राष्ट्रीय खेळाडूला दांडक्याने मारहाण

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI