पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू, पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्यावर दोन दिवसांपासून सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू, पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मृतक सुरेश पिंगळे यांचा फोटो


पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सुरेश पिंगळे यांनी टोकाचं पाऊल का उचललं?

केवळ पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही या कारणाने सुरेश पिंगळे यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटसमोर स्वत: ला पेटवून घेतलं होतं. दोन अडीच महिने ते खडगी पोलीस ठाणे, तसेच पोलीस आयुक्तालयात हेलफाटे मारत होते. मात्र कुठलंतरी कारण सांगून त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जात नव्हतं. त्यामुळे ते वैतागले होते. अखेर त्यांनी संतापात स्वत:ला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पिंगळे पाषाण येथील एआरडीई येथे कंत्राटी पद्धतीने ऑफिस बॉयचं काम करायचे. त्यांचा दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट बदलायचा. तिथे दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेशन लागायचं. आतापर्यंत दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेश लागत होतं. दरवर्षी ते मिळत होतं. पण यावेळी त्यांना अडचण आली.

मृतदेह ताब्यात घेणार नाही, पिंगळे यांच्या कुटुंबियांची भूमिका

या घटनेनंतर पिंगळे यांचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून जोपर्यंत आपल्या जबाबादारीची हमी देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पिंगळे यांच्या पत्नीने घेतली आहे. या घटनेनंतर पिंगळे यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

“मला न्याय हवाय. माझ्या मुलांचं मी काय करु. मला नोकरी नाही. एकतर मला नोकरीला लावावं. मला नोकरी लागली तर मुलांचं पोट भरेल. कारण नोकरीसाठीच त्यांनी आत्मदहन केलं आहे. पोलीस अधिकारी याबाबत लेखी स्वरुपात सांगत असतील आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ”, असं पिंगळे यांच्या पत्नीने सांगितलं.

पोलिसांची नेमकी भूमिका काय?

या प्रकरणावर पोलिसांनी याआधीच भूमिका स्पष्ट केली आहे. सुरेश पिंगळे नावावर तीन गुन्हे दाखल होते. त्यापैकी दोन गुन्हे हे दुसऱ्या व्यक्तीवर दाखल असल्याची नंतर माहिती मिळाली होती. तर तिसऱ्या गुन्ह्या संदर्भातही तपास सुरु होता. त्याचा अहवाल आल्यानंतर व्हेरिफिकेशन देण्यात येणार होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

बुधवारी पोलीस आयुक्तालयात थरार

सुरेश पिंगळे बुधवारी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आले होते. त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हवं होतं. पण कदाचित त्यांना वेळेवर ते प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी संतापात टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं. इतकंच नाही तर त्या पेटत्या अंगाने त्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली. हा सर्व थरार उपस्थित लोक पाहात होते. त्याचवेळी काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पेटत्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचं धाडस काहींना करता आलं नाही. पण काहींनी ते धाडस करुन, आग विझवली. त्यानंतर सुरेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दोन दिवसांच्या उपचारानंतरही सुरेश यांची प्राणज्योत मालवली. या सर्व थरारानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

खंडणीचा हप्ता देण्यास नकार, चाकणमध्ये कोयत्याने वार करत तरुणाचे सोन्याचे दागिने लुटले

पुण्यात निवृत्त एअरफोर्स अधिकारी ‘हॅनी ट्रॅप’च्या जाळ्यात, 50 लाखांची खंडणी मागितली, पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI