Jalgaon Tourist Rescue : गारबर्डी धरणावर अडकलेल्या 9 पर्यटकांची सुटका, ग्रामस्थ आणि प्रशासनाने तरुणांना सुखरुप बाहेर काढले

सुकी नदीवरील हे पाल वनविभागात असून सध्या वनक्षेत्रात चांगल्या प्रकारे पाऊस होत असल्यामुळे गारबर्डी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे पर्यटन वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात. असेच पर्यटनासाठी गेलेले 9 पर्यटक अडकून पडले होते.

Jalgaon Tourist Rescue : गारबर्डी धरणावर अडकलेल्या 9 पर्यटकांची सुटका, ग्रामस्थ आणि प्रशासनाने तरुणांना सुखरुप बाहेर काढले
गारबर्डी धरणावर अडकलेल्या 9 पर्यटकांची सुटका
Image Credit source: TV9
रवी गोरे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 18, 2022 | 11:40 PM

रावेर : तालुक्यातील गारबर्डी येथील सुकी नदीवरील धरणा (Dam)वर अडकलेल्या 9 पर्यटकां (Tourist)ची सुखरुप सुटका (Rescued) करण्यात आली आहे. अडकलेले सर्व पर्यटक पिकनिकसाठी धरणावर आले होते. मात्र धरण ओव्हरफ्लो झाल्याने हे सर्व जण धरणावर अडकून पडले. पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तहसीलदारांनी बचाव पथकाला प्रचारण केले होते. बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत अडकलेल्या सर्वांची सुटका केली. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाने अडकलेल्या 9 जणांना सुखरूप बाहेर काढले. सर्व पर्यटक हे मुक्ताईनगर तालुक्यातील आहेत.

तरुण नदीच्या मधोमध अडकले होते

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत आहे. या जलप्रवाहाच्या विळख्यात 9 पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी 6.30 वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बेहरे, सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देऊन बचाव कार्य तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळताच त्यांनी फैजपूर चे प्रांताधिकारी कैलास कडलग आणि रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सतत सुरू असलेला पाऊस तसेच नदीपात्रात वाढत जाणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मिळण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधण्यात आला. त्यानुसार धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडीही घटनास्थळाकडे रवाना झाली.

गुरख्याने पर्यटक अडकल्याचे पाहिल्यानंतर प्रशासनाला माहिती दिली

सुकी नदीवरील हे पाल वनविभागात असून सध्या वनक्षेत्रात चांगल्या प्रकारे पाऊस होत असल्यामुळे गारबर्डी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे पर्यटन वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात. असेच पर्यटनासाठी गेलेले 9 पर्यटक अडकून पडले होते. मात्र गुरख्याला हे पर्यटन अडकल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने याबाबत स्थानिक प्रशासनाला ही माहिती देण्यात आली. घटनास्थळी तात्काळ स्थानिक प्रशासन आणि मच्छीमारांच्या मदतीने पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संतोष दरबार राठोड, इम्रान शाह इकबाल शाह, रतन भंगी बारेला, दारासिंग रेवाल सिंग, गोविंदा चौधरी, सिकंदर गुलजार यांनी अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. यासाठी त्यांना स्थानिक आमदार शिरीष चौधरी, रावेर तहसील कार्यालय, सावदा पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय फैजपूर, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी आदीचे सहकार्य लाभले.

सुटका करण्यात आलेल्या पर्यटकांची नावे

1. गणेश पोपतसिंग मोरे (28 एकनाथ नगर मुक्ताईनगर)
2. आकाश रमेश धांडे (24 रा.एकनाथ नगर मुक्ताईनगर)
3. पियुष मिलिंद भालेराव (23 एकनाथ नगर मुक्ताईनगर)
4. जितेंद्र शत्रूंग पुंड (30 रा. चिखली ता. मुक्ताईनगर)
5. मुकेश श्रीराम धाडे (19 रा.एकनाथ नगर मुक्ताईनगर)
6. लखन प्रकाश सोनवणे (25 रा.एकनाथ नगर मुक्ताईनगर)
7. अतुल प्रकाश कोळी (22 रा.एकनाथ नगर मुक्ताईनगर)
8. विष्णू दिलीप बोरसे (19 रा. एकनाथ नगर मुक्ताईनगर)
9. रमेश सोनवणे (24 रा. एकनाथ नगर मुक्ताईनगर)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें