VIDEO : वाळू माफियांची गुंडगिरी, भर बाजारात पत्रकारावर भीषण हल्ला, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

जाफराबादेत वाळू माफियांची गुंडगिरी फोफावली आहे. पैशांच्या लोभापाई त्यांच्यातला माणूस हरवलाय आणि हैवानाने जन्म घेतलाय (Sand Mafia attack on reporter in Jalna).

VIDEO : वाळू माफियांची गुंडगिरी, भर बाजारात पत्रकारावर भीषण हल्ला, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद
वाळू माफियांची गुंडगिरी, भर बाजारात पत्रकारावर भीषण हल्ला


जालना : जाफराबादेत वाळू माफियांची गुंडगिरी फोफावली आहे. पैशांच्या लोभापाई त्यांच्यातला माणूस हरवलाय आणि हैवानाने जन्म घेतलाय. त्यांना इतका माज आलाय की त्यांना पोलिसांची देखील भीती वाटत नाही. त्यांनी शुक्रवारी (11 जून) थेट पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला. हातात लाठ्या-काठ्या घेऊन सात ते आठ जणांनी पत्रकाराला जीवघेणी मारहाण केली. विशेष म्हणजे जाफराबादेत भर रस्त्यात पंचायत समिती समोर वाळू माफियांनी पत्रकाराला मारहाण केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या हल्ल्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील मारहाणीवर अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे (Sand Mafia attack on reporter in Jalna).

नेमकं काय घडलं?

जाफराबाद जवळून पूर्णा नदी वाहते. या नदीतून अवैध वाहतूक होत असल्याच्या बातम्या दैनिक ‘पुढारी’चे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांनी छापून आणल्या होत्या. याचा राग वाळू माफियांना होता. यातूनच वाळू माफियांनी हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे जाफराबाद तालुका हादरला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकार संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे (Sand Mafia attack on reporter in Jalna).

जाफराबाद मराठी पत्रकार संघटनेचं पोलिसांना निवेदन

ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावरील हल्ल्याचा पडसाद संपूर्ण तालुक्यात पडला आहे. या हल्लेप्रती अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर पाबळे यांना न्याय मिळावा यासाठी जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाने पोलिसात धाव घेतली आहे. पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी विनंती पत्रकार संघाने निवेदन देऊन केली आहे.

पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

“ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफियांकडून भ्याड हल्ला झाला. जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आम्ही या संदर्भात जाफराबाद पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना निवेदन दिले आहे. पाबळे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली आहे”, अशी प्रतिक्रिया जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाकडून देण्यात आली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत एक निवेदन दिलं आहे. त्यांच्या निवेदनानुसार योग्य कारवाई होईल. फिर्यादी ज्यावेळी फिर्याद देतील त्यावेळी योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. दरम्यान, पत्रकारावरील या हल्ल्याचा सर्व पत्रकार आणि नागरिक निषेध व्यक्त करत आहेत. हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करून पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील पत्रकार करत आहेत.

हल्ल्याचा व्हिडीओ बघा :

संबंधित बातम्या :

100 गुन्हे, पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, हैदर अखेर गजाआड, कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI