Dombivli Crime : मोबाईल पासवर्डवरून कुटुंबात राडा ! लाटणं, तवा, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण
डोंबिवलीतील खोणी पलावा येथे मोबाईल पासवर्डवरून झालेल्या घरगुती वादाने हिंसक वळण घेतले. एका कुटुंबात आजोबा आणि मुलाने कंबरपट्टा व स्वयंपाकघरातील वस्तूंनी आई आणि मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेत माय-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी किरकोळ कलमे लावून तपास ढिसाळ केल्याने संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील, मुंबईतील सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये अनेक महत्वाचे, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मात्र याच डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाणही प्रचंड वाढले असून आता सुशिक्षित कुटुंबातीलच एक राडा समोर आला आहे. मोबाईल पासवर्डवच्य शुल्लक कारणावरून झालेल्या राड्यानंतर घरातील प्रमुख गृहिणीला आणि मुलाला गुरासारखी बेदम मारहाण करण्यात आली. खोणी पलाव्यात हा भयंकर प्रकार घडला आहे. आजोबांच्या मोबाईलचा पासवर्ड बदलण्यावरून खोणी पलाव्यातील कासा एड्रियाना सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या एका कुटुंबात रक्तरंजित हिंसाचार झाला. यामुळे एकच दहशत माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या खोणी पलाव्यातील भयंकर प्रकार उजेडात आला आहे. मोबाईल पासवर्डवरून झालेल्या राड्यानंतर आजोबा आणि मुलाने कंबरपट्ट्यासह स्वयंपाक घरातील लाटणे, कडीवाला तवा याचा वापर करत हल्ला केला, त्यात 47 वर्षांची महिला रक्तबंबाळ झाली. एवढंच नव्हे तर मुलगादेखील जबर जखमी झाला असून माय-लेकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पण ण संतापजनक गोष्ट म्हणजे एवढा गंभीर प्रकार घडूनही मानपाडा पोलिस ठाण्यातील गुन्हा दाखल करून तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने किरकोळ कलमे टाकून या गु्न्ह्याची नोंद करून घेतली. खुनाच्या प्रयत्नाचा हा गंभीर गुन्हा असुनही गुन्हा घडून चार दिवस उलटले तरी तपास अधिकारी या प्रकरणातील आरोपींना अटक करत नव्हता. या प्रकरणाला गती मिळेल यादृष्टीने प्रयत्न करत नव्हता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी बिकाशकुमार गणेश यादव (वय 24) याने या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. बिकाशकुमार हा खोणी गावाजवळ असलेल्या पलावा कासा एड्रियाना येथे आई रेणू यादव, मोठा भाऊ आकाशकुमार (वय 26), आजोबा राजेंद्र राय (वय 76), आजी मालतीदेवी (वय 70) यांच्यासह एकत्र राहतो. तर बिकाशकुमारचे वडील पूर्वीपासून कुटुंबापासून विभक्त राहतात.त्याचे आजोबा राजेंद्र राय हे सेवानिवृत्त आहेत. त्यामुळे त्यांना निवृत्ती वेतन मिळते.
मुलाने केली आई, भावाला मारहाण
गेल्या आठवड्यात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आजोब राजेंद्र राय यांनी बिकाशकुमारची आई रेणू यादव यांना जाब विचारला. तुझा मुलगा बिकाशकुमार काहीच काम करत नाही. माझ्या निवृत्ती वेतनावर मी तुम्हाला किती दिवस पोसू ? शिवाय माझ्या मोबाईलमधील पासवर्ड (पीन क्रमांक) कुणी बदलला ? असे त्यांनी विचारले. तेव्हा त्या मोबाईलचा पासवर्ड पीन नंबर हा आजोबांच्या सूचनेवरून बदलल्याचे मोठा भाऊ आकाशकुमार याने सांगितले. यावरून बिकाशकुमार आणि आकाशकुमार या दोन्ही भावांमध्ये वादावादी होऊन त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.
घरात पडला होता रक्ताचा सडा
स्वयंपाक घरातील तवा, लाटणे हाणामारीसाठी वापरण्यात आले. यात बिकाशकुमार गंभीर जखमी झाला. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी आई रेणू ही मध्ये पडली तर तिच्यावरही आकाशकुमारने हल्ला चढविला. आजोबा राजेंद्र यांनी चामडी पट्ट्याने रेणू यांना मारहाण केल्याचे बिकाशकुमार याने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. यादव यांच्या घरातील भांडणाचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी धावून आले. शेजारधर्म म्हणून सर्वांनी मिळून हा वाद सोडविला. घरात पडलेला रक्ताचा सडा पाहून रहिवासी हादरले. रहिवाशांनी या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या बिकाशकुमारसह त्याची आई रेणू यादव या दोन्ही माय-लेकाला उचलून तातडीने रूग्णालयात हलविले. सध्या तया दोघांची प्रकृती ठीक आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
