उल्हासनगरमध्ये मोठे हत्याकांड! मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्याचा 30 सेकंदात खेळ खल्लास, गर्भवती पत्नीचा आक्रोश
उल्हासनगरच्या कॅम्प १ मध्ये साजिद शेख या तरुणाची १५-२० जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केली. जुना वाद कारणीभूत असून, आरोपींना अटक करण्याची मागणी साजिदच्या गर्भवती पत्नीने केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, परंतु उर्वरित फरार आहेत.

उल्हासनगर कॅम्प १ परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची १५ ते २० जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी त्या तरुणावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. साजिद शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा त्याच्या गरोदर पत्नीने घेतला आहे.
नेमंक काय घडलं?
साजिद शेख आणि मुख्य आरोपी रोहित पासी यांच्यात जुने वाद होते. हे वाद मिटवण्यासाठी १ ऑगस्ट रोजी रात्री ते कॅम्प १ परिसरातील साईबाबा मंदिराच्या जवळ भेटले. या भेटीत त्यांच्यातील वाद मिटण्याऐवजी अधिक वाढला. यानंतर रात्री साधारण अडीचच्या सुमारास रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल यांनी साजिदच्या मित्राला अडवले. साजिदला तिथे बोलावले. मित्राला वाचवण्यासाठी साजिद तिथे पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
जवळपास १५ ते २० जणांनी साजिदच्या डोके आणि शरीरावर चाकूने सपासप वार केले. यामुळे त्याच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखम झाली. या गंभीर जखमांमुळे साजिदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपासाला वेग दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ रोहित पासी आणि प्रवीण उज्जीनवाल या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मात्र, या हत्येत सहभागी असलेले इतर १५ ते २० आरोपी अजूनही फरार आहेत. या फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र जोपर्यंत इतर आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा त्याच्या गरोदर पत्नीने घेतला आहे. यामुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे.
स्थानिकांची मागणी आणि मृत कुटुंबाची परिस्थिती
साजिद शेख हा एक सामान्य तरुण होता. त्याच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः त्याची पत्नी सध्या गरदोर असून तिने आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमा होऊन सर्व आरोपींना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. जुन्या भांडणातून सूड घेण्यासाठीच ही हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे, जेणेकरून फरार आरोपींना पकडता येईल.
या घटनेमुळे उल्हासनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांपुढे आता उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान आहे.
