हृदयद्रावक ! ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले आणि डोळ्यांसमोरच… सणाच्या दिवशीच काळाचा घाला
छत्रपती संभाजीनगर येथे दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना घडली. वाळूज परिसरात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या मुलांसोबत जे घडलं ते वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. सणाचा उत्साह या दुर्दैवी घटनेमुळे शोकात बदलला. पोलिसांनी नक्की काय झालं ?

काल विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण राज्यभरात उत्साहाने साजरा झाला. अनेक ठिकाणी रावणदहनही करण्यात आले. नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपास दसऱ्याला सोडून, गोड-धोड खाऊन, सोनं वाटून, मोठ्यांचे आशिर्वाद घेऊन अनेकांनी उत्साहाने सण साजरा केला. मात्र याच सणाला छत्रपती संभाजीनगर येथे गालबोट लागलं. ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने घाळा घातला आणि सणाचा उत्साह काळवंडून गेला. वाळूज परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली.
दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील लिंबे जळगाव येथे काल, गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबे जळगाव शिवारातील शेतात राहणाऱ्या कुटूंबातील इमरान इसाक शेख (वय 17 वर्ष) हा दसऱ्यानिमित्त गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या गायरान मधील मुरूम उपसानंतर पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्या सोबत त्याच कुटुंबातील इमरान इसाक शेख (वय 10 वर्)षे, जेहान हयादखान पठाण (वय 10 वर्षे) व घराशेजारील मुलगा गौरव उर्फ वेंकटेश दत्तू तारक (वय 10) ही 3 लहान मुले देखील गेली होती.
खोल पाण्यात तिघे बुडाले, वाचवायला गेलेल्याचाही झाला मृत्यू
त्या चौघांनी तिथे ट्रॅक्टर स्वच्छ धुतला. मात्र त्यानंतर ही तिन्ही लहान मुलं आंघोळीसाठी पाण्यात उतरली, पण ते पाण्यात बुडू लागले. ते तिघे बुडत असल्याचे पाहून इरफान इसाक शेख त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र तिथे पाणी जास्त खोल असल्याने त्या चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कळताच गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली पण खूप उशीर झाला होता. अखेर बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना प्रथम शिवराई टोल नाक्याजवळील सी एस एम एस एस हॉस्पिटल येथे व नंतर घाटी रुग्णालयात रवाना केले.
या घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे, पोलीस अंमलदार पांडुरंग शेळके, पोलीस अंमलदार स्वप्निल खाकरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या चौघांचाही मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी घाटीत दाखल करण्यात आले आहेत. पुढील चौकशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे करत आहेत.
