सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं, काच खाली न केल्याच्या रागातून हत्याकांड

गुरुग्राममध्ये तीन नोव्हेंबरला सॉफ्टवेअर इंजिनिअर पूजा शर्माची डोक्यात गाोळी मारुन हत्या करण्यात आली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:00 PM, 20 Nov 2020

गुरुग्राम : गुरुग्राममधील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीच्या हत्येचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. लुटीच्या उद्देशानेच गोळी झाडून पूजा शर्माची हत्या (Pooja Sharma Murder) करण्यात आली होती. गाडीची काच खाली न केल्यामुळे रागाच्या भरात पूजावर गोळी झाडल्याचं आरोपींनी कबूल केलं. दोन आठवड्यांचा तपास आणि चारशे सीसीटीव्ही कॅमेरांचे फूटेज तपासल्यानंतर पोलिसांनी तिघा सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. (Three arrested in Gurugram Techie Pooja Sharma Murder Case)

गुरुग्राममधील दक्षिण पेरिफेरल रोडवर तीन नोव्हेंबरला सॉफ्टवेअर इंजिनिअर पूजा शर्माची डोक्यात गाोळी मारुन हत्या करण्यात आली होती. मूळ छत्तीसगडची असलेली पूजा आयटी कंपनीत काम करत होती. ऑफिसच्या कामानिमित्त ती 25 ऑक्टोबरला गुरुग्रामला आली होती.

हत्येच्या वेळी पूजा बॉयफ्रेण्ड सागरसोबत त्याचीच कार चालवत निघाली होती. पूजा सेक्टर 65 मधील डीपीएस इंटरनॅशनल स्कूलजवळ पोहोचली. तेव्हा तिथे दबा धरुन बसलेल्या आरोपींनी तिच्यावर गोळी झाडली होती.

पूजा शर्मा हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात आली. सोनसाखळी चोरी आणि दरोड्याचे शंभरहून अधिक गुन्हे असलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हरिओम उर्फ ​​कुलदीप, इर्शाद उर्फ ​​गोलू, आणि जितेंद्र उर्फ ​​जीतू यांची पोलिसांनी धरपकड केली. मात्र या तिघांनी पूजाची हत्या केली असेल, यावर सुरुवातीला पोलिसांचा विश्वास बसत नव्हता.

पूजा चालवत असलेली सागरची क्रेटा कार चोरण्याच्या उद्देशाने हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात थांबवलं. आरोपींनी तिला गाडीची काच खाली करण्यास सांगितलं, मात्र पूजाने त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे चिडून त्यांनी डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली होती.

तिघा आरोपींनी गुरुग्राममधील अनेक भागात गाडी, मोबाईल यांची लूट करुन ब्लॅकमेलिंग, हत्या यासारखे अनेक गुन्हे केले आहेत. दोन आठवड्यांचा तपास, दोनशेहून अधिक जणांची चौकशी आणि जवळपास चारशे सीसीटीव्ही कॅमेरांचे फूटेज तपासल्यानंतर पोलिसांनी तिघा सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. (Three arrested in Gurugram Techie Pooja Sharma Murder Case)

संबंधित बातम्या :

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींच्या चौकशीतून 20 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

(Three arrested in Gurugram Techie Pooja Sharma Murder Case)