Maithili Thakur Election Result : गाणी गाऊन जास्त कमावते की आमदार बनून? मैथिली ठाकूरला जास्त पैसा मिळणार? जाणून घ्या कमाई
संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नितीशकुमार सत्ता राखणार की राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची सत्ता येणार, याचा फैसला या निकालातून होणार आहे. अशातच मैथिली ठाकूरची विशेष चर्चा आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. राज्यातील सर्व 243 मतदारसंघांतील कल येण्यास सुरुवात झाली आहे. ही मतमोजणी जसजशी पुढे सरकतेय, तसतसा राजकीय नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक फेरीच चित्र बदलल्याचं दिसून येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेली उमेदवार म्हणजे लोकगायिका मैथिली ठाकूर. कलेचा करिश्मा तिला विधानसभेत पोहोचवेल का आणि जरी तसं झालं तर तिची आमदारकीची कमाई तिच्या स्टेज शोजपेक्षा जास्त असेल का, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. वयाने लहान असलेली उमेदवार मैथिली ठाकूर अशाच विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे.
2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि सर्व 243 जागांसाठीचे कल समोर येत आहेत. अशातच अलीनगर विधानसभा मतदारसंघ देशभरात चर्चेतत आहे. दरभंगा जिल्ह्यातील या जागेनं केवळ राजकीय स्पर्धेमुळेच नाही तर एका स्टार उमेदवारामुळेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूरला भाजपने उमेदवारी दिली आहे. तिच्याविरोधात आरजेडीचे अनुभवी नेते विनोद मिश्रा आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील स्पर्धा अधिक मनोरंजक बनली आहे.
मैथिली ठाकूरने रिअॅलिटी शोजमधून लोकप्रियता मिळवली. केवळ देशभरातच नाही तर परदेशातही तिच्या शोजचं आयोजन केलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, ती महिन्याला जवळपास 12 ते 15 लाइव्ह शोज करते. या शोजमधून ती पाच ते सहा लाख रुपये कमावते. याचा अर्थ ती वर्षाला 60 ते 90 लाख रुपये सहज कमावते. यातून हे स्पष्ट होतंय की कलेनं तिला केवळ ओळखच नाही तर पैसाही मिळवण्यात मदत केली आहे.
View this post on Instagram
बिहारमध्ये आमदाराचा मूळ पगार हा 50 हजार रुपये आहे. याशिवाय त्यांना विविध भत्ते मिळतात. यात 55 हजार रुपयांचा प्रादेशिक भत्ता, 3 हजार रुपयांचा दैनिक बैठक भत्ता, 40 हजार रुपयांचा वैयक्तिक सहाय्यक भत्ता आणि 15 हजार रुपयांचा स्टेशनरी भत्ता यांचा समावेश आहे. हे सर्व जोडल्यास, आमदाराचं मासिक उत्पन्न हे 1,43,000 रुपयांपेक्षा जास्त होतं. खरं उत्पन्न हे आमदार पदासोबत मिळणाऱ्या भत्त्यांमधून येतं.
बिहारच्या आमदारांना मासिक पगाराशिवाय अनेक भत्ते मिळतात. वार्षिक 4 लाख रुपयांपर्यंतचे रेल्वे किंवा विमान प्रवासाचे कूपन्स, 25 लाख रुपयांपर्यंतचं वाहन कर्ज, माजी आमदारांसाठी 45 रुपयांचं मासिक पेन्शन, 29 हजार रुपयांचा आतिथ्य भत्ता, सुरक्षा, सरकारी निवासस्थान, अनुदानित वीज, पाणी, फोन बिल आणि सरकारी रुग्णालयांमधील विशेष उपचार.. अशा असंख्य सोयी आमदारांना मिळतात. याचा अर्थ, आमदाराची कमाई जरी कलाविश्वातील सेलिब्रिटींपेक्षा जास्त नसली तरी त्यांची समाजातील शक्ती, सुविधा आणि विशेष ओळख या पदाला खूप शक्तीशाली बनवते.
